कांतीलाल कडू यांच्या चमत्कारामुळे व्यापार्याला पावला बाप्पा
..............................
डॉ. प्रविण स्वामी यांनी दाखविला मनाचा मोठेपणा
कळंबोली/प्रतिनिधी
कोरोनाच्या युद्धात डॉक्टरांच्या मदतीने सोळा दिवसांचीलढत देत असलेल्या कळंबोलीतील पटेल नावाच्या व्यापार्याला गणपती बाप्पा पावला. हॉस्पीटलच्या देयकाच्या रक्कमेत चक्क अडीच लाखाचे बिल माफ करण्यात आले आहे. हा चमत्कार सामाजिक कार्यकर्ते कांतीलाल कडू यांनी नेहमीप्रमाणेच करून दाखविला आहे. त्यांनी यासंदर्भात सुआस्थ हॉस्पीटलचे डॉ. प्रविण स्वामी यांचे मनोमन आभार मानले आहेत. डॉक्टरांनी मनाचा मोठेपणा दाखवून ही रक्कम माफ केल्याने पटेल यांच्या कुटूंबाचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आर्थिक मंदीचे वादळ घोंगावत असताना कोरोना उपचार करण्याची मुशिबत अनेकांवर येत आहे. दररोजच्या लूटमारीच्या बातम्या कानावर पडल्यानंतर डॉक्टरांविषयी चीडही वाढीस लागली आहे.
त्यातच पनवेल संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू कोविडच्या युद्धात अनेकांचे वार परतवून लावत कोविड रूग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना सहिसलामत बाहेर काढण्यासाठी अनेकांना वेळप्रसंगी अंगावर घेवून न्याय देत आहेत.
कळंबोलीतील सामाजिक कार्यकर्ते संतोष शिंदे यांनी पटेल यांच्या मुलाची कैफियत ऐकून त्यांना कांतीलाल कडू यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले. त्यानुसार पटेल यांनी हकिगत सांगितली.
डॉ. प्रविण स्वामी यांच्याशी फोनवरून संपर्क साधला. त्यांच्याही व्यथा ऐकून घेतल्या. कडू यांच्या निरपेक्ष कामाची त्यांनीही स्तुती केली. सहज गप्पा मारता मारताच अतिशय आनंदाने आपण सांगाल तितक्या रक्कमेची सवलत देतो, असे म्हणत डॉक्टरांनी मनाचा कप्पा उघडला. कडू यांनी पुन्हा एकदा रूग्णाच्या खिशाचा अंदाज घेवून फोन करतो, असे सांगितले.
रूग्णाकडे पैशाची चणचण होतीच, परंतु हॉस्पीटलमध्ये 16 दिवस काढल्यानंतर हॉस्पीटल, औषध खर्च आणि रूग्णाचा विचार करून साडे सहा लाख रूपयांतील अडीच लाख रूपयांची सवलत द्यावी, असे कडू यांनी डॉ. स्वामी यांना सांगितले. डॉक्टरांनीही लगेच होकार दिला. त्यावेळी पटेल यांचा बाप्पा पावल्याचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. त्यांनी डॉ. स्वामी आणि कांतीलाल कडू यांचे आभार मानले.