विशेष संपादकीय
......................
एवढा का राग हा उत्सव नको म्हटल्यावरी
नाचुया ना संकटाची वादळे हटल्यावरी
शांत झाले आज सारे कारखान्यांसारखे
फक्त भोंगे वाजती हे कोर्ट खटल्यासारखे
कळत नाही फुलत जातो श्वास जेव्हा आपला
शाश्वती नसते कशाची पाकळी मिटल्यावरी
राख कोणाच्या मुखी तर कोण आगीच्या मुखी
कोण लोणी चाखतो मडके जरा फुटल्यावरी
रोज घंटा वाजते आश्वासनाची मंदिरी
देवही चुकला कुठे थोतांड हे नटल्यावरी
तू तुला सांभाळ थोडी काळजी घे या क्षणी
फार मोलाचे असे जगणे तुला पटल्यावरी
- कांतीलाल कडू
............................................
आयुष्याच्या घड्याळाचे काटे पुढे सरकत चालले आहेत. सणवार थोबाडीत मारल्यासारखे फक्त दिनदर्शिकेवर हसत आहेत. अर्ध वर्ष असेच सरले. पुढचे सहा महिने यापेक्षा काही वेगळे जातील असे विश्वासाने सांगता येत नाही. आर्थिक मंदी जीव घेतल्याशिवाय गप्प बसेल असेही वाटत नाही. हाती असतानाही कुणी काहीच करू शकत नाही. त्यात पावसाळा यंदा दिसतो तसा चांगला नाही. पुढच्या खेपेला पोटात ढकलायला अन्न मिळेल असे सांगता येत नाही. अशात उत्सवांचा उत्सव, ऊर्जेचा स्त्रोत, भक्ती-शक्तीचा संगम आणि ढोल वाजावे तसे अंगात संचारला जातो तो गणेशोत्सव आज पासून सुरू होत आहे. तो सुद्धा अगदी सुतकी चेहऱ्याने साजरा करावा लागत आहे. पण उत्सव साजरा करताना एकमेकांना भेटणं टाळायला हवं. भेट घ्यायची असेल तर ती गणरायाची गळाभेट घ्या. त्याच्या विशुद्ध चक्रात आपले विशुद्ध चक्र मिसळून निरोगी जगण्याची उर्मी घ्या.
उत्सव आणि उत्साह एकमेकांच्या भेटीतून अधिक सकारात्मक बनवते. परंतु एकांतात, तपश्चर्या, साधना करताना उत्साह शतपटीने वाढतो. तेज, ओज वाढते. आरोग्य सुदृढ राहते. प्रत्येक श्वासांच्या लहरीतून उत्सव साजरा होत असतो. मात्र भौतिक सुखात अडकलेल्या माणसांना ते तात्काळ प्राप्त होत नसल्याने पूजा, उपासना कर्मकांडांना प्राधान्य देणारी बुरसट विचारसरणी भासत आहे. त्यात देवावर ही प्रिती जडते ती एक तर भीतीपोटी किंवा काही तरी प्राप्त करण्यासाठी असते. त्यातही काही वावगे आहे असे म्हणता येणार नाही. परंतु, त्यातून काही हासिल होत नाही म्हटल्यावर माणूस जसा दर निवडणुकीला राजकीय पक्ष बदलतो तसे तो दर संकटात देवही सहज बदलू लागला आहे. यालाच म्हणतात आत्मविश्वासाचा अभाव.
साथ रोग सुरू आहे. देवांनी मंदिरांचे दरवाजे बंद करून घेताना नास्तिकांची मांड अधिक भक्कम करून दिली आणि आस्तिकांच्या श्रध्देच्या पताका वाऱ्यावर फडकत ठेवल्या आहेत. काहींच्या पताका बोरी बाभळीच्या वनात अडकून फाटत चालल्या आहेत तर काहींच्या उंच शिखरावर सन्मानाचे अत्तर लावून फडफडत आहे. ते खरे श्रध्दावान. परिस्थिती बदलत असते आपली श्रध्दा दगडावर घासून वारंवार तपासून पाहण्याची गोष्ट नाही आणि म्हणूनच हे दिवस सरतील. भोग हरतील. अजून थोडा धीर धरायला हवा अशी मनाशी खूणगाठ बांधली तर गणेशोत्सव घरातल्या घरात अत्यंत आनंददायी करता येईल. एरव्ही गजबजलेल्या घरात बाप्पा आपल्याशी गप्पा मारायला विसरून जातो. यंदा तुम्हाला आणि त्यालाही खुप वेळ आहे. फक्त स्वतःच्या कुटुंबातील माणसांचाच गराडा पडणार असेल तर त्याच्या मनातील अनेक गुपिते तो तुम्हाला सांगू शकेल. तुम्ही संवाद साधून बघा. तुम्ही बाप्पाला साद घाला, तो नक्की प्रतिसाद देईल. हीच तर श्रद्धा आहे, हीच भक्तीची वाट आहे, संतांनी, ॠषी, साधकांनी अनुभवलेली. त्या वाटेवरून यंदा चालायला खुप वेळ आणि वाव आहे.
खरंच देवाशी, त्या बाप्पाच्या मुर्तीशी बोलून बघा. त्याला हाक मारा मीरेच्या प्राणांतून, त्याला जेवण-खाऊ भरवा नामदेवांच्या हातातून, त्याला घट्ट मिठी मारा हनुमंतासारखी. हातात जे असेल ते प्रेमाने भरवत राहा शबरीसारखे... तो भावप्रिय आहे, भावग्राह्य आहे. भक्तांच्या हाकेला आसुसलेला आहे. अठ्ठावीस युगे तो भक्तांच्या एका प्रेमळ शब्दांवर कटेवरचे हात काढून उडी घ्यायला तयार आहे. आपली हाक कुठे तरी तोकडी पडते...
गणेशोत्सव यंदाचा पाहता अत्यंत कडक शिस्तीत सरकारने साजरा करण्याचे संकेत दिले आहेत. काही परंपरा असल्या, संस्कृती असली तरी चोहीकडे संकट पहारा देवून असल्याने सावध राहणे हेच गणेशोत्सवाचे मोठे फलित ठरेल. आतापेक्षा शतपटीने कोरोना बाधित क्षेत्र होईल. हॉस्पिटलमध्ये जागाच उरणार नाही. एक चुक खुप महागात पडू शकते म्हणूनच गर्दी टाळायला लावून सार्वजनिक गणेशोत्सव रद्द केला आहे. केवळ उत्सव रद्द झाला नाही. हजारो कोटीचे आर्थिक गणित कोलमडून पडले आहे. ते करण्यामागे निश्चित सरकारची व्यूहरचना आहे.
एवढ्यासाठीच कुणाकडे गणपती दर्शनाला जावू नका. गेल्या काही दिवसात बाजारात जी गर्दी उसळत आहे, त्याचे फळ कोविड आकड्यांवरून दिसून येत आहेत. मटक्याच्या आकड्यांचा बाजार आणि कोविडचा आजार दोन्ही विध्वंसक आहेत. तेव्हा आकड्यांपासून दूर राहण्यासाठी दुरुनच, घरात बसूनच मनोमन बाप्पाला आठवून दर्शन घ्या. चोखामेळा कधीही पंढरीला गेले नाही. त्यांच्या भाजीपाल्याच्या मळ्यात विठ्ठल प्रकटला होता. मग तुम्हाला तो कसा दूर करेल. फक्त चोख्याच्या भावाने हाक मारून तर बघा. बाप्पाचा उत्सव फक्त कुटुंबापुरताच यंदाच्या वर्षी साजरा करा. शेजाऱ्यांनाही थोडे समजावून सांगा. नातेवाईकांना बोलावण्याचा हट्टाहास करू नका. आयुष्य खुप मोठं आहे. त्याचा आस्वाद घेण्याची आशा बाळगून स्पष्ट शब्दात सांगा, गणपती बाप्पा मोरया, दर्शनाला पुढच्या वर्षी या. स्वतःच्या आरोग्याची काळजी घेता घेता दुसऱ्यांना जपायला हवंच.अज्ञान सरो आणि बुद्धीच्या देवतेने कोरोनाचे संकट दूर करण्याचे सामर्थ्य देवो!