Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, ऑगस्ट २१, २०२०

32 वर्षीय डॉक्टरांचा कोरोनाने मृत्यू

धक्कादायक






चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालय येथील 32 वर्षीय डॉक्टरांचा कोरोनाने मृत्यू

- आज जिल्ह्यात आढळले तब्बल 60 कोरोना बाधित

- डॉक्टरांचा कोरोनाने मृत्यू झाल्याने आरोग्य यंत्रणेत खळबळ


डॉ. सुनील टेकाम हे राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे कार्यरत होते. ते मुळचे मु. पो. राजुरा येथील होते. कोविड -19 मध्ये कर्तव्यावर असताना कोविड -19 ची बाधा झाली. आज दि. 21/8/2020 रोजी यांचा मृत्यू झाला. सदर डॉ. हे विदर्भ आयुर्वेद महाविद्यालय अमरावती येथून यांनी पदवी घेतली होती. 2 वर्षाची छोटी मुलगी सुद्धा आहे. आता बाधितांची संख्या 1306 वर पोहोचली आहे. 



एकाच दिवशी 57 बाधित आले पुढे

जिल्ह्यातील 866 बाधितांना आतापर्यंत सुट्टी

चंद्रपूर, दि. 21 ऑगस्ट : वरोरा येथे कार्यरत असतांना अनेक बाधितांना मृत्यूच्या दारातून बाहेर काढणाऱ्या एका तरुण कोरोना योद्ध्यांचा चंद्रपूरमध्ये अकाली मृत्यु झाला. या घटनेने संपूर्ण जिल्हा प्रशासन हळहळले आहे . जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी या घटनेबद्दल आपल्या संवेदना व्यक्त केल्या आहेत. आरोग्य यंत्रणेतील फ्रन्टलाइन कर्मचाऱ्यांनी अतिशय दक्षतेने या आणीबाणीच्या काळात काम करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील या घटनेमुळे आरोग्य यंत्रणा देखील हळहळली आहे. जिल्ह्यामध्ये आत्तापर्यंत 1306 व्यक्तींना कोरोनाची बाधा झाली असून आतापर्यंत 866 बाधित आजारातून बरे झाले आहे. सध्या 428 बाधित उपचार घेत आहे. जिल्ह्यामध्ये आत्तापर्यंत दहा बाधिताचा मृत्यू झाला आहे.

आज मृत्यू झालेले बाधित राजुरा येथील 32 वर्षीय वैद्यकीय अधिकारी आहे. वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात ते गेल्या एक वर्षापासून कंत्राटी तत्त्वावर नॅशनल हेल्थ मिशनमध्ये कार्यरत होते. आयुर्वेद उपचार ते यापूर्वी देत होते. जिल्ह्यामध्ये कोरोना संक्रमण सुरू झाल्यानंतर या युवा डॉक्टरने वरोरा येथील कोरोना केअर सेंटरमध्ये कोरोना आजारा संदर्भातील रुग्णांच्या सेवेमध्ये स्वतःला झोकून दिले होते. रुग्णांची तपासणी करणे, औषधोपचार करणे या कार्यात ते अग्रणी होते. 6 ऑगस्टला लक्षणे दिसायला लागल्यानंतर त्यांचा स्वॅब घेण्यात आला. संपर्कातून पॉझिटीव्ह आल्यानंतर 7 आगस्ट पासून ते वन अकादमीमध्ये अलगीकरणात होते. मात्र त्यानंतर 12 ऑगस्टपर्यंत त्यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना चंद्रपूर जिल्हा वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल करण्यात आले. गेल्या तीन-चार दिवसांपासून त्यांच्यावर शर्तीचे प्रयत्न सुरू होते. मात्र अखेर या तरूण वैद्यकीय अधिकार्‍याला कोरोनाच्या विळख्यातून सोडवता आले नाही. आज शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजता त्यांचा मृत्यू झाला.

आज पुढे आलेल्या 57 बाधितांमध्ये चंद्रपूर महानगरातील 22, बल्लारपूर शहरातील 14, घुगुस परिसरातील 3 मूल तालुक्यातील 2, भद्रावती तालुक्यातील 7 राजुरा तालुक्यातील 3 ब्रह्मपुरी तालुक्यातील एक, कोरपना तालुक्यातील 4 व सिंदेवाही तालुक्यातील एका बाधिताचा समावेश आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी कुटुंबाप्रती संवेदना व्यक्त केल्या
चंद्रपूरचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने सध्या त्यांचे अंगरक्षक बाधित आढळून आल्यानंतर अलगीकरणात आहेत. कोरोना योद्धा म्हणून काम करणाऱ्या एका युवा वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मृत्यूबद्दल त्यांनी आपल्या  संवेदना व्यक्त केल्या आहेत. संपूर्ण जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणा या दु:खात आपल्या कुटुंबासोबत असून वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचार करताना योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. सोबतच जिल्ह्यातील नागरिकांनीदेखील कोरोनाशी लढताना सूचनांचे योग्य पालन करावे. केवळ आपल्या दुर्लक्षामुळे इतरांना त्याची कधीही भरून निघणारी किंमत चुकवावी लागू नये, याकडे लक्ष ठेवावे, असे कळकळीचे आवाहन त्यांनी केले आहे.

पालकमंत्री वडेट्टीवार यांनी व्यक्त केले दुःख
राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांनी देखील या घटनाक्रमाने हळहळ व्यक्त केली. आरोग्य यंत्रणेकडे आपल्या संवेदना व्यक्त केल्या आहेत. प्रशासनातील अधिकारी, वैद्यकीय अधिकारी व पूर्ण वेळ लढणारे फ्रन्टलाइन वर्कर अतिशय तन्मयतेने शुश्रुषा करत असून या काळात त्यांनी देखील आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. घटनेमध्ये निधन झालेल्या तरुण डॉक्टरच्या कुटुंबाप्रती त्यांनी आपल्या संवेदना कळविल्या आहेत.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.