स्वातंत्र्य दिन ध्वजारोहण कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक संभ्रमात
राज्य सरकारलाच मराठी भाषेचा विसर
नागपूर / अरूण कराळे (खबरबात)
राज्य सरकारने राज्यातील सर्व सरकारी पत्रव्यवहार मराठी भाषेतून करण्याचे स्पष्ट निर्देश दिले असतांना खुद्द राज्य सरकारनेच २९ जुलै रोजी कोविड-१९ मिशन बिगीन अगेन चक्क इंग्रजीमधून काढले असून सदर पत्र व केंद्र सरकारचे २० जुलै व २९ जुलै रोजी इंग्रजी पत्र जसेच्या तसे जोडून स्वातंत्र्य दिनाच्या ध्वजारोहण बाबत इंग्रजी सहपत्रातील सूचनांचे तंतोतंत पालन करण्याच्या सूचना जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केल्या आहेत.
सदर २३ पानी इंग्रजी भाषेत असलेल्या सूचनांचे वाचन केल्यानंतरही नेमके ध्वजारोहण कसे करावे याबाबत मुख्याध्यापक संभ्रमात आहेत.
जिल्हा परिषद शिक्षण विभागाने शाळेतील ध्वजारोहण कार्यक्रम आयोजित करण्याबाबत मराठी भाषेतून सुस्पष्ट मार्गदर्शक सूचना नमूद करून पत्र काढावे, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक शिक्षकेत्तर सेनेकडून करण्यात येत आहे.