Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, जून १९, २०२०

ऊर्जेची मागणी पूर्ण करण्यासाठी महानिर्मिती आणि एनटीपीसी यांच्या प्रयत्नातून २५०० मेगावॅटचा सौर ऊर्जा प्रकल्प:डॉ.नितीन राऊत

नागपूर(खबरबात):
राज्याच्या भविष्यातील ऊर्जेची मागणी पूर्ण करण्यासाठी महानिर्मिती आणि एनटीपीसी यांच्या संयुक्त प्रयत्नातून २५०० मेगावॅटचा सौर ऊर्जा प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी योग्य जागा शोधण्याच्या सूचना राज्याचे ऊर्जा मंत्री डॉ.नितीन राऊत यांनी आज येथे विद्युत भवन नागपूर येथून व्ही.सी.द्वारे आयोजित बैठकीत दिल्या. 
ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांनी महानिर्मिती आणि महाऊर्जाच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधताना ते पुढे सांगितले कि, एनटीपीसीने हा वीज प्रकल्प तयार करण्यासाठी उत्सुकता दाखवली आहे. महानिर्मितीने प्रकल्पासाठी आवश्यक असणाऱ्या जागेचा शोध घेऊन याचा सविस्तर अहवाल सादर करावा. 

राज्याला हरित ऊर्जेसंदर्भात स्वयंपूर्ण करण्यासाठी महानिर्मिती, महावितरण महापारेषण आणि वीज नियामक आयोग यांनी समन्वयातून एकत्रित प्रयत्न केले पाहिजेत. सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, घन कचऱ्यापासून वीज निर्मिती यासारख्या हरित ऊर्जा प्रकल्पाकडे सर्वानी गांभीर्याने बघण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. 

सौर आणि पवन ऊर्जेचा संयुक्त प्रकल्प होऊ शकतो काय यावर देखील वीज क्षेत्रातील तज्ज्ञानी विचार करण्याचे निर्देश उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.
अमरावती जिल्ह्यातील गव्हाणकुंड येथील १६ मेगावॅटच्या सौर ऊर्जा प्रकल्पाची माहिती त्यांनी यावेळी घेतली. या प्रकल्पाचे काम आता अंतिम टप्यात असून लवकरच यातून वीजनिर्मिती सुरु होईल अशी माहिती महानिर्मितीतर्फे डॉ. राऊत यांना देण्यात आली.

नंदुरबार जिल्ह्यातील दोंडाईचा येथे २५० मेगावॅटच्या सौर ऊर्जा प्रकल्पाचा आढावा त्यांनी घेतला. या प्रकल्पासाठी जागा अधिग्रहित झाली असून निविदा प्रक्रिया पूर्ण करून प्रत्यक्ष प्रकल्पाच्या कामाला लवकर सुरुवात करावी, अशी सूचना त्यांनी अधिकाऱ्याना दिल्या.

या बैठकीस प्रधान सचिव(ऊर्जा) दिनेश वाघमारे, महानिर्मितीच्या व्यवस्थापकीय संचालिका शैला ए. , महावितरणचे संचालक (वाणिज्य)सतीश चव्हाण, महानिर्मितीचे संचालक (प्रकल्प) थंगपांडियन , हाय पॉवर कमिटीचे अनिल नगरारे, मुख्य अभियंता प्रकाश खंडारे, राजकुमार तासकर, मिलिंद नातू, राजेश पाटील, नागपूर प्रभारी प्रादेशिक संचालक महावितरण सुहास रंगारी आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.