नागपूर(खबरबात):
नागपूर शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागात तसेच वर्धा जिल्ह्यात लॉकडाऊनच्या कालावधीत बंद करण्यात आलेले मीटर रिडींग व वीजबिल वितरणाचे काम स्थानिक प्रशासनाची परवानगी मिळालेल्या भागात आणि कोरोना प्रतिबंधित क्षेत्र वगळून सुरु करण्यात आले आहे.
दरम्यान, 23 मार्चनंतर आता वीजग्राहकांकडील मीटर रिडींग घेतल्यानंतर प्रत्यक्ष वीजवापराच्या युनिटप्रमाणे दोन ते अडीच महिन्यांचे एकच अचूक वीजबिल दिले जात आहे. यामध्ये ग्राहकांनी एप्रिल, मे महिन्यात भरलेली रक्कम व सरासरी युनिट समायोजित केले जात आहे.
कोरोना विषाणूमुळे लॉकडाऊनच्या कालावधीत महावितरणकडून मीटर रिडींग घेणे व छापील वीजबिल वितरीत करणे तात्पुरते बंद करण्यात आले होते. १ जूनपासून शासनाने लॉकडाऊन शिथिल केल्यामुळे वीजबिल भरणा केंद्र सुरु करण्यासोबतच वीजग्राहकांकडे जाऊन मीटर रिडींग घेणे व वीजबिल वितरीत करणे सुरु करण्यात आले आहे.
स्थानिक प्रशासनाने परवानगी दिलेल्या भागामध्ये आणि कोरोना प्रतिबंधीत क्षेत्र (कन्टेंटमेंट एरिआ) वगळून वीजग्राहकांकडील मीटरचे रिडींग घेण्यात येत आहे. एजन्सीजच्या कर्मचाऱ्यांनी मीटर रिडींग घेताना हॅण्ड ग्लोव्हज, मास्क, सॅनिटाजर तसेच फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमाचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच सोसायट्यांमध्ये प्रवेश करण्यापूर्वी आवश्यक असल्यास परवानगी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहे.