मृत्यूनंतर आली १०८, वेळ लागल्यामुळे गेला प्राण
नागपूर/ अरूण कराळे ( खबरबात )
कोरोना विषाणूची धास्ती नागरीकासह १०८ रूग्णवाहीकेने घेतली असल्याचे दिसून येत आहे . शासनाने १०८ नंबरवर फोन करुन लगेच रुग्णवाहीकेची सेवा रूग्णांना रुग्णालयात पोहचण्यासाठी सुरू केली आहे .परंतु आता कोरोनामुळे १०८ वर कॉल करुनही रुग्णवाहीका वेळेवर पोहोचली नसल्यामुळे ट्रक चालकाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवार २६ मे राेजी नागपूर तालुक्यातील वडधामना येथे घडली .पोलीस सूत्राच्या प्राप्त माहितीनुसार ट्रकवरील चालक एन रवि नारायणअप्पा वय ४० रा. सोंपपन्हाल्ली बेट्टहालसुर बेंगलोर नार्थ कर्नाटक असे मृतकाचे नाव असून मृतक केए ५० ए ८६५८ या क्रमांकाचा ट्रक चार दिवसापूर्वी बेंगलोर वरून आंबे घेवून गोरखपूर येथे गेला आंब्याची गाडी रिकामी केली. तेथून तो ट्रक घेऊन सोमवार २५ मे रोजी वडधामना येथे पोहोचला. सध्या शहरातील तापमान ४५° डिग्रीच्या आसपास असल्यामुळे चालकाला उष्माघात झाला .सोमवार २५ मे रोजी सायंकाळी काही लोकांच्या मदतीने चालक रवी ने वडधामना येथील खाजगी डॉक्टरांकडे उपचार केला.
डॉक्टरांनी उष्माघात झाल्याचे सांगीतले व त्यांना ग्लूकोज दिले. त्याला बरं वाटल्यामुळे डॉक्टरने त्याला डिस्चार्ज दिला. चालक आपल्या गाडीत येऊन झोपला. तो गाडीत एकटा असल्यामुळे गाडीत काही सुविधा नसल्यामुळे त्याचा आजार आणखी वाढला.सकाळी काही लोक पाहायला गेले असता ड्रायव्हर गाडीमध्येच पडलेला दिसला.त्याला ताबडतोब रूग्णालयात नेण्यासाठी लोकांनी १०८ वर फोन केला पण दोन तासांनंतरही रुग्णवाहिका पोहोचली नाही.दोन तासांनंतरही रुग्णवाहिका न पोहोचल्याने लोकांचा रोष सरकारी यंत्रणेवर उमटला.शेवटी दोन तासानंतर १०८ रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचली. परंतु तो पर्यंत वेळ निघून गेली होती .डॉक्टरने रवी ची तपासणी केली असता त्याला मृत घोषित केले.रुग्णवाहिका मात्र रिकामी परत गेली. हजर असलेल्या लोकांनी ही माहिती वाडी पोलिस स्टेशनला दिली.वाडी पोलिस घटनास्थळी पोहोचून घटनेचा पंचनामा केला. मृतकाचे शव वाडी पोलिस स्टेशन मध्ये नेण्यात आले. ट्रक चालकाचा परिवार बेंगलोर मध्ये असल्यामुळे त्यांच्या मृत्यूची सुचना बेंगलोर पोलिसांना दिली . मृतकाचे शव विच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले. पुढील तपास वाडी पोलीस करीत आहे.