चंद्रपूर {खबरबात}:
जिल्ह्यात अलीकडच्या काही वर्षात न्युज वेब पोर्टल व युट्युबच्या माध्यमातून पत्रकारितेचे पेव फुटले आहे. हा वाढलेला सुळसुळाट थांबून त्यावर नियंत्रण ठेवण्याची मागणी माजी महानगर पालिका गटनेते रीतेश रामू तिवारी यांनी जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांच्याकडे केली आहे.
शहरी व ग्रामीण बातम्यांसाठी बातमी संकलन, गावपातळीपर्यंत प्रतिनिधींची नियुक्ती, ब्रेकिंग न्युज, चंद्रपूर ब्रेकिंग, बातमी व जाहिराती साठी संपर्क करा अशा प्रकारे न्युज पोर्टल व युट्युब चॅनेल ने वॉट्सअप वर अनेक ग्रुप मधून जाहिराती सुरु असतात.
रजिस्ट्रार ऑफ द न्यूजपेपर फॉर इंडिया (RNI) भारत सरकारच्या सूचना व प्रसारण मंत्रालयाच्या अखत्यारीत येते त्या मध्यमातुन नोंदणीकृत वृत्तपत्रांना ई- पोर्टल परवानगी मिळाल्याने सोशल मीडियावर जवळपास सर्वच वृत्तपत्रे उपलब्ध आहेत. मात्र हि वृत्तपत्रे जबाबदारीने व नियमाने वृत्त प्रकाशित करीत जबाबदारी देखील घेत असतात.
कोरोना विषाणू कोविड १९ च्या देखील अधीरतेने चुकीच्या बातम्या टाकून जनमानसात भीतीचे वातावरण निर्माण करण्याच्या घटना घडल्यात. अनेक वेळा राजकारणी व व्यवसायिकांना देखील जाहिरातीसाठी वेठीस धरले जाते. हा सर्व प्रकार थांबण्यासाठी कडक पाऊले उचलून जिल्हा माहिती अधिकाऱ्या मार्फत चौकशी करून या प्रकारांना आळा घालून नियंत्रित करण्याची मागणी रितेश रामू तिवारी यांनी जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांना केली आहे.