दीड महिन्यापासुन १७ निवारा केंद्रात व्यवस्था
निवास, भोजन व आरोग्य व्यवस्था
शेवटच्या ७५ ची झाली आज रवानगी
चंद्रपूर- चंद्रपूर शहर महानगरपालिकेने लॉकडाऊनच्या काळात चंद्रपूर शहरात अडकलेल्या एकूण ५०९ परराज्यातील कामगारांची आतापर्यंत त्यांच्या राज्यात पाठवणी केली असून आज छत्तीसगड राज्यातील ३८ व मध्य प्रदेशातील ३७ असे एकूण ७५ नागरीक मनपाच्या विशेष वाहन व्यवस्थेने त्यांच्या गावी रवाना झाले आहेत. मनपातर्फे सर्वांची खाण्याची व वैद्यकीय तपासणीची सोय करुन सर्वांना पालिकेने सोय केलेल्या खाजगी बस व इतर गाड्यांमधून त्यांच्या राज्यात, त्यांच्या गावी रवाना केले आहे. या सर्वांनीच मनपा प्रशासनाचे विशेष आभार मानले, गावी जाण्याचा आनंदही त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता.
कोरोनाचा चा प्रसार रोखण्यासाठी केंद्र शासनाने संपूर्ण देशभरात लॉकडाऊन केले आहे. अनेक कामगार हे आपल्या मूळ गावी परत जाण्यासाठी निघाले असता, सोशल डिस्टन्सिंग राखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांचे उल्लघंन होत असल्याने त्यांना शासन निर्देशानुसार स्थानबद्ध करण्यात आले होते. तेलंगणा, उत्तर प्रदेश, बिहार मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ अश्या विविध राज्यातील तसेच महाराष्ट्रातील गडचिरोली, गोंदिया, अकोला, लातुर, वर्धा, नांदेड, भंडारा, यवतमाळ या विविध शहरातील मजूर, कामगार, विद्यार्थी चंद्रपूर शहरात अडकले होते. मे महिन्यापासून मनपाच्या निवारा केंद्रांमध्ये थांबलेल्या या नागरिकांची निवास, भोजन व आरोग्य व्यवस्था मनपा प्रशासनद्वारे करण्यात येत होती.
गेले दीड महिना लॉकडाऊन मुळे कामधंदा नाही, कुटुंब गावी या द्विधा मनस्थितीत नागरिक आणि मजूर अडकलेले होते, मात्र चंद्रपूर महानगरपालिका प्रशासनाने अखेर सर्व प्रक्रिया करून या मजूर, नागरिकांना त्यांच्या गावी वाहनांनी पाठवण्याचा निर्णय घेतला. ७५ प्रवाशी अगदी समाधानाने आपल्या गावी परतानाचे दृश्य आज पहावयास मिळाले.
महानगरपालिकेच्या माध्यमातुन या कामगारांसाठी गावी जातांना भाजी - पोळी, पिण्याचे पाणी इत्यादींची व्यवस्था करण्यात आली होती. मनपाच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. कीर्ती राजूरवार यांच्या नेतृत्वात विशेष आरोग्य पथकांनी त्यांची आरोग्य तपासणी केली. महापौर सौ. राखी कंचर्लावार व आयुक्त राजेश मोहिते यांनी सर्वांना काळजी घेण्याचे आवाहन करतानाच सोशल डिस्टस्टींग चे काटेकोरपणे पालन करण्याचे सांगितले. तपासणी व समुपदेशन करून त्यांना पाठविण्यात आले. यावेळी उपायुक्त विशाल वाघ, मनपा वैद्यकीय अधिकारी डॉ.किर्ती राजुरवार, डॉ.वनिता गर्गेलवार,नागेश नीत तसेच महानगरपालिका आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने शिथिलता दिल्यानंतर या सर्वच नागरिकांना त्यांच्या गावी पोहोचविण्यात येत आहे. त्यासाठी,रेल्वे,बस आणि खासगी वाहनांने प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. परराज्यातील मजूरांना स्पेशळ श्रमिक ट्रेनच्या सहाय्याने राज्य सरकारने त्यांच्या राज्यात पाठविण्यात सुरुवात केली आहे. तर, जिल्ह्यांतर्गतही स्थलांतरीतांची घरवापसी होत आहे. मात्र, या सर्वांना वैद्यकीय प्रमाणपत्र अनिवार्य करण्यात आले आहे.