संपर्कातील 57 पैकी 49 स्वॅब निगेटीव्ह ; 8 अहवालाची प्रतिक्षा
चंद्रपूर, दि. 9 मे : चंद्रपूर शहरात 2 मे रोजी आढळलेल्या कृष्ण नगरातील एकमेव पॉझिटिव्ह रुग्णाची प्रकृती स्थिर आहे. रुग्णाला कोविड व्यतिरिक्त आजारासाठी यापूर्वीच नागपूरला दाखल करण्यात आले आहे. या रुग्णाच्या संपर्कातील एकूण 89 नागरिकांपैकी 57 नागरिकांचे स्वॅब घेण्यात आले. 57 पैकी 49 स्वॅब निगेटिव्ह आले आहेत. 8 अहवालाची प्रतीक्षा आहे.
आरोग्य यंत्रणेकडून आज काढण्यात आलेल्या मेडिकल बुलेटीनमध्ये दिलेल्या माहितीनुसार पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील आतापर्यंत 89 व्यक्तींची यादी तयार करण्यात आली आहे. या एकूण 89 व्यक्तींपैकी 64 नागरिकांचे गृह अलगीकरण करण्यात आले आहे. 25 नागरिकांचे संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले आहे.
कृष्ण नगर व लगतच्या सर्व परिसराला कंटेनमेंट झोन अर्थात प्रतिबंधात्मक क्षेत्र जाहीर करण्यात आले आहे. या ठिकाणच्या एकूण 2 हजार 152 घरातील 8 हजार 540 नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे. या भागातील नागरिकांच्या इन्फुन्झा सदृश्य आजाराची देखील तपासणी करण्यात आली आहे. अशा प्रकारचे 5 रुग्ण संशयित होते. मात्र तपासणीअंती ते देखील निगेटिव्ह आले आहे. तसेच अति गंभीर श्वसनाचा आजार असणाऱ्या आणखी 5 लोकांचे नमुने देखील निगेटिव्ह आले आहे. संबंधित पॉझिटिव्ह रुग्णाच्या परिवारातील पत्नी, मुलगा व मुलगी यांचे निकाल देखील निगेटिव्ह आहे. आता 14 व 15 मे रोजी या रुग्णाची पुन्हा स्वॅब तपासणी होणार असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.
सध्या जिल्ह्यातील कोविड -19 परिस्थिती पुढील प्रमाणे आहे. जिल्ह्यामध्ये विलगीकरण कक्षात भरती केलेल्या व्यक्तींची संख्या 194 असून यापैकी 194 व्यक्तीची स्वॅब तपासणी करण्यात आली आहे.एका व्यक्तीचा निकाल पॉझिटिव्ह आला असून 175 नमुने निगेटिव आले आहे. या पैकी 18 नमुने अद्याप प्रतीक्षेत आहे .सध्या 175 नागरिकांना डिस्चार्ज देण्यात आला आहे . सध्या वैद्यकीय महाविद्यालयात कोविड आजारा संदर्भात भरती असलेल्या व्यक्तींची संख्या 18 आहे.
जिल्ह्यामध्ये सध्या तालुकास्तरावर 93 तर चंद्रपूर महानगरपालिका सरावर 128 असे एकूण 221 नागरिकांचे संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले आहे.
जिल्ह्यामध्ये 9 मे रोजी पर्यंत गृह अलगीकरण करण्यात आलेल्या एकूण नागरिकांची संख्या 42 हजार 276 आहे. यापैकी 36 हजार 816 नागरिकांचे गृह अलगीकरण पूर्ण झाले आहे. सध्या जिल्ह्यामध्ये 13 हजार 182 नागरिक गृह अलगीकरणात आहे.