जिल्हा पुरवठा अधिकारी यांचा आदेश
वाडी प्रेस क्लबच्या कार्यालयात पत्रपरिषद
नागपूर: अरुण कराळे:
वाडी शहरातील जास्तीत-जास्त भाग ट्रान्सपोर्ट व औद्योगिक क्षेत्रात विभागला असल्याने येथे काम करणाऱ्या कामगाराची संख्या मोठ्या प्रमाणात आहे .अचानक आलेल्या चायना मेड कोरोना विषाणूचा देशात फैलू नये यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात लॉकडाऊन केल्याने कामगारांचा रोजगार बंद पडल्याने दोन वेळेची भूक भागविणे शक्य होत नाही.अशा गरजू गोरगरिबांना तात्काळ धान्य मिळावे म्हणून स्वस्त धान्य दुकानातून राशन मिळावे यासाठी वाड़ी नगर परिषदेचे नगराध्यक्ष प्रेम झाडे व उपनगराध्यक्ष राजेश थोराने यांनी जिल्हाधिकारी, तहसिलदार,जिल्हा पुरवठा अधिकारी यांना निवेदन दिले.
कोरोना संसर्गजन्य रोगामुळे अत्यावश्यक सेवा व्यतिरिक्त सर्व बंद असल्याने सर्वसामान्य गरीब यात भरडला जात आहे.शासन अनेक प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवित असून त्याच अनुषंगाने प्रत्येक तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानातुन शिधापत्रिका नसलेल्या व त्याच गांवात खूप वर्षांपासून राहत असलेल्या व ज्यांची आर्थिक परिस्थिती खूपच हलाकीची आहे अशा गरीब-गरजू कुटुंबाची प्रमाणित माहिती कुटुंब प्रमुखाचे नाव,कुटुंबातील सदस्य संख्या,सदस्यांचे आधार नंबर,पत्ता,मोबाईल क्रमांक याप्रमाणे विहित विवरणामध्ये लवकरात-लवकर देण्याच्या सुचना तहसीलदार यांना जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी यांनी दिली आहे .
नागपूर ग्रामीणचे तहसीलदार मोहन टिकले यांच्या बैठकीत निर्णय झाल्यानुसार शहरात वास्तव्य करणाऱ्या व शिधापत्रिका नसलेल्या गरजू लोकांची स्थानिक नगरपरिषदे तर्फे सर्वे करून तहसीलदार व मुख्याधिकारी यांची स्वाक्षरी असलेली अधिकृत यादी जिल्हाधिकारी कार्यालयाला पाठविण्यात येणार आहे.यादीवर शिक्कामोर्हत होताच तेवढ्याच लाभार्थीचे राशन संबंधित स्वस्त राशन दुकानात पाठवून वितरित केल्या जाणार आहे.त्यासाठी नागरिकांनी नगरसेवक,तलाठी यांचेशी संपर्क साधून परिपूर्ण माहीती देण्याचे आवाहन वाडी प्रेस क्लब च्या कार्यालयात नगराध्यक्ष प्रेम झाडे उपनगराध्यक्ष राजेश थोराने यांनी केले.