शक्य नसल्यास मार्च,एप्रिलची दोन्ही देयके
स्वीकारण्याची विमाशि संघाची मागणी
नागपूर : अरूण कराळे:
टप्पा पगाराचा निर्णय मार्चच्या वेतनाऎवजी एप्रिलच्या वेतनातून लागू करावा शक्य नसल्यास शालार्थ प्रणालीमध्ये ब्रोकन पिरेडची सुविधा उपलब्ध असल्यामुळे मार्च, एप्रिल या दोन्ही महिन्याची देयके एकदम स्वीकारण्याचे आदेश देण्यात यावे अशी मागणी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे प्रांतीय अध्यक्ष एस. जी. बरडे यांनी महाराष्ट्राचे अर्थमंत्री, शालेय शिक्षण मंत्री व शालेय शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव यांचेकडे एका लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
राज्यातील बहुसंख्य जिल्ह्यातील माहे मार्च २०२० च्या वेतनाची देयके त्या त्या जिल्ह्याच्या कोषागार कार्यालयाकडे यापूर्वीच वेतन पथक कार्यालयाकडून सादर केली असून कोरोना संचार बंदीमुळे शाळा बंद आहेत. त्यामुळे शासनाने घेतलेल्या नवीन निर्णयाप्रमाणे ७५ व ५० टक्क्याची वेतन देयके तयार करणे व वेतन पथक कार्यालयात सादर करणे संचार बंदीमुळे महिनाभर तरी शक्य होणार नाही. त्यामुळे टप्पा पगाराचा निर्णय माहे मार्च २०२० ऎवजी एप्रिल २०२० ची वेतन देयके बनवताना लागू करावा व माहे मार्च २०२० ची वेतन देयके आहे त्या स्थितीतच मंजूर करावी असे विमाशिचे प्रांतीय अध्यक्ष एस.जी. बरडे यांनी शासनास पाठविलेल्या निवेदनात स्पष्टपणे नमूद केले आहे.
शिक्षक कर्मचाऱ्यांच्या यापूर्वीच्या माहे जानेवारी व फेब्रुवारी २०२० च्या वेतन देयकातून इन्कम टॅक्सची रक्कम मोठ्या प्रमाणात कपात करण्यात आली असल्याने राज्यातील शिक्षक कर्मचारी आर्थिक विवंचनेत आहे. त्यामुळे टप्प्याचे वेतन देण्याचा निर्णय रद्द करणे शक्य नसल्यास एप्रिलची वेतन देयके सादर करण्याची वेळ झाली असल्यामुळे मार्चच्या टप्पा देयकासोबतच माहे एप्रिल पेड इन मे २०२० ची देयके स्वीकारण्याचे आदेश द्यावे जेणेकरून शिक्षक कर्मचाऱ्यांना एप्रिलच्या वेतनासाठी ताटकळत राहण्याची गरज पडणार नाही असेही विमाशिचे प्रांतीय अध्यक्ष एस.जी. बरडे यांनी निवेदनात नमूद केले आहे.
या निवेदनाच्या प्रती महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक महामंडळाचे अध्यक्ष तथा माजी आमदार व्ही.यू. डायगव्हाणे, महाराष्ट्राचे शिक्षण आयुक्त व शिक्षण संचालक यांनाही पाठविण्यात आल्या आहेत.