व्ही.सी. वर साधला संवाद
नागपूर/प्रतिनिधी:
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रात्री ९ वाजता ९ मिनिटे घरातील दिवे मालवून ९ मिनिटे मेणबत्ती,पणती, मोबाईल फ्लैश लावण्याचे आवाहन केल्यानंतर राज़्याचे ऊर्जा मंत्री डॉ.नितीन राऊत यांनी जनतेला या काळात अखंडित वीजपुरवठा सुरू ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.
आज सकाळी ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी ऊर्जा सचिव आणि महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक आसिम गुप्ता, महापारेषणचे व्यवस्थापकीय संचालक दिनेश वाघमारे, महानिर्मितीच्या व्यवस्थापकीय संचालक श्रीमती शैलजा ए. यांच्याशी संवाद साधला. वीज कंपन्यांच्या वतीने करण्यात आलेल्या उपायोजनेचा तपशीलवार आढावा घेतला.
रात्रीच्या वेळी महावितरणचे सर्व वीज उपकेंद्र आणि फिडर सुरू राहतील, जनतेला त्रास होणार नाही, याची काळजी यंत्रणेने घेणे गरजेचे आहे.
महापारेषणच्या ४०० के.व्ही.च्या सर्व वीज वाहिन्या व्यवस्थित कार्यरत असल्याची माहिती महापारेषणचे व्यवस्थापकीय संचालक दिनेश वाघमारे यांनी दिली.
वीजेची मागणी मागील १० दिवसात कमी झाल्याने सध्या महानिर्मितीचे ५ संच कार्यरत असल्याची माहिती महानिर्मितीच्या व्यवस्थापकीय संचालक श्रीमती शैलजा ए. यांनी दिली. आकस्मिक परिस्थितीत कोयना जलविद्युत केंद्र आणि उरण येथील वायु ऊर्जा प्रकल्प, तिलारी,भिरा जलविद्युत केंद्र पूर्णपणे तयार आहे. हे जलविद्युत केंद्र आवश्यकतेनुसार रात्री ८.३० वाजल्यापासून पूर्णपणे सुरू राहणार आहेत, असेही श्रीमती शैलजा ए.यांनी यावेळी सांगितले.
वीजेची वारंवारिता ४९.९ ते ५०.२ या दरम्यान ठेवण्यात सातत्याने प्रयत्न केला जाईल,असे ऊर्जा सचिव आणि महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक आसिम गुप्ता यांनी सांगितले.
आजच्या बैठकीत नागपूर कार्यालयात महावितरणचे नागपूर परिक्षेत्राचे प्रभारी प्रादेशिक संचालक सुहास रंगारी, प्रभारी मुख्य अभियंता दिलीप दोडके, महापारेषणच्या मुख्य अभियंता ज्युईली वाघ, अंबाझरी भार प्रक्षेपण केंद्राचे मुख्य अभियंता भाऊराव राऊत उपस्थित होते.
बैठकीनंतर ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी अंबाझरी भार प्रक्षेपण केंद्रास भेट देऊन तेथील कार्यप्रणालीचा आढावा घेतला व अधिकऱयाना सतर्क राहण्याचे आदेश दिले. राज्यातील जनतेला अखंडित वीज पुरवठा राहावा म्हणून आज रात्री ८.३० ते ९.३० या वेळेत ऊर्जामंत्री विद्युत भवन नागपूर नियंत्रण कक्षातून राज्यभरातील अधिकाऱ्यांशी समन्वय ठेवणार आहेत.