महिलेचा मृत्यू झाल्यानंतर तिच्या पार्थिवावर अत्यसंस्कार करण्यास दिल्लीतील निगमबोध घाट येथे नकार देण्यात आला. यामुळे पीडित कटुंबीयांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
: निगमबोध घाट येथे अंत्यसंस्कारासाठी नकार मिळाल्यानंतर या कुटुंबाला लोधी रोड येथील स्मशानभूमीतही महिलेच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करू दिले गेले नाहीत.
दिल्लीतील राम मनोहर लोहिया रुग्णालयात काल या महिलेचा कोरोना विषाणूमुळे मृत्यू झाला. भारतात कोरोनामुळे झालेला हा दुसरा मृत्यू आहे.
या महिलेवर अत्यसंस्कारासाठी त्यांचे कुटुंबीय आज निगमबोध घाटावर गेले असताना तेथून त्यांना अंत्यसंस्कारासाठी नकार देण्यात आला.
त्रस्त झालेल्या कुटुंबीयांनी स्मशानभूमीच्या प्रमुखांना फोन लावून अंत्यसंस्काराची विनंती केली. मात्र महिलेचा मृतदेह इथून ताबडतोब दुसरी कडे न्या आणि अन्य ठिकाणी तिच्यावर अंत्यसंस्कार करा, असे उत्तर पीडित कुटुंबाला मिळाले.
दुसऱ्या स्मशानभूमीवरही रोखले
त्रस्त झालेल्या या पीडित कुटुंबाने अंत्यसंस्कारासाठी लोधी रोड स्मशानभूमी गाठली. इथे अंत्यसंस्कार होऊ शकतील या आशेने कुटुंबीय मृतदेह घेऊन तेथे पोहोचले होते. मात्र, तिथेही त्यांना नकारच देण्यात आला.