शासनाने संगणक परीचालकांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी संगणक परीचालकांचे बेमुदत काम बंद आंदोलन
येवला प्रतिनिधी/ विजय खैरनार
येवला : तालुक्यातील 89 ग्रामपंचायत मध्ये तसेच राज्यातील ग्रामपंचायत मध्ये संगणक परिचालक म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या विविध प्रकारच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी सोमवारी ( दि.16 ) पासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू करण्यात आले असून याबाबतचे निवेदन येवला पंचायत विस्तार अधिकारी श्री. अहिरे यांना देण्यात आले आहे.
निवेदनात म्हंटले आहे की , महाराष्ट्र राज्यातील आपले सरकार प्रकल्पातील ग्रामपंचायत , पंचायत समिती व जिल्हा परिषद स्तरावरील संगणक परीचालकांना महाराष्ट्र आय.टी. महामंडळाकडून कर्मचारी दर्जा देऊन कायमस्वरूपी नियुक्ती करण्याची मागणी संगणक परीचालकांनी केली आहे. गत वर्षी झालेल्या आझाद मैदानात मागील सरकारने संगणक परीचालकांच्या हातात तुरा देऊन प्रलंबित मागण्या पूर्ण करू असे आश्वासन दिले होते. मात्र एक वर्ष उलटूनही अद्याप संगणक परिचालक केवळ आश्वासनावरच ठेवलेले असून आता हीच ती वेळ म्हणत पुन्हा कामबंद करून शासनाचे लक्ष वेधण्यासाठी कामबंद आंदोलन सुरू करणार आहे.
सध्या ग्रामपंचायत कडून एका संगणक परीचालकांसाठीच्या एका महिन्याच्या मानधनासाठी 12130 रुपये या प्रमाणे एक वर्षासाठी संबंधित कंपनीला 1,47,972 रुपये 14 वित्त आयोग मधून देण्यात येत असतात.यातून संगणक परीचालकाला 6000 रुपये प्रति महिना मानधन कंपनीने ठरवून दिले आहे.परंतु हे सर्व पैसे संबंधित कंपनीला आधीच ग्रामपंचायत कडून देण्यात येते. विशेष बाब म्हणजे संबंधित कंपनीला हे सर्व पैसे ग्रामपंचायत कडून धनादेश द्वारे वेळेच्या आधीच जमा केलेले असतात. त्यामुळे पैसे आधी जमा करून ही प्रत्येक महिन्याला वेळेत मानधन मिळत नसून कंपनीला आधी पैसे जमा करूनही वेळेत मानधन जमा होत नसल्याने ही रक्कम जाते कुठे ? असा सवाल वारंवार ग्रामपंचायत सरपंच आणि सदस्य उपस्थित करत आले आहे. मानधन मिळाले तरी दोन - तीन महिन्यानंतर एकदा मानधन संगणक परीचालकाला देण्यात येते. यात एका वर्षाचे 1,47,972 रुपये संबंधित कंपनीला दिले असता यातून संगणक परीचालकाला वर्षाला 50 ते 60 हजार रुपयेच पदरी पडतात तर बाकीची शिल्लक रक्कमेचे पाणी मुरते कुठे असा सवाल नेहमी उपस्थित होत आहे. राज्य शासनाने दिल्लीच्या सि.एस.सी. - एस.पी.व्ही. या कंपनीला आपले सरकार सेवा केंद्र चालविण्यासाठी दिला आहे. परंतु या कंपनीने ग्रामीण भागातील ग्रामपंचायत मध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला असून 14 वित्त आयोगाने जनतेच्या विकासासाठी दिलेल्या निधीवर डल्ला मारला असून सुमारे मागील तीन वर्षात आपले सरकार सेवा केंद्र प्रकल्पात तब्बल 300 कोटींचा भ्रष्टाचार , मनमानी कारभार या प्रकल्पात झाला आहे.याबाबत अनेकदा तक्रारी करून ही अद्यापही कोणत्याही कारवाई संबंधित विभागाकडून होत नसल्याने नाराजी व्यक्त केली जात असून शासन सि.एस.सी. - एस.पी.व्ही. या कंपनीला पाठीशी घालत असल्याची तक्रार संगणक परीचालकांनी केला आहे. मुंबई च्या आझाद मैदानात झालेल्या 27 ते 30 नोव्हेंबर 2018 मध्ये झालेल्या आंदोलनात शिवसेना पक्षप्रमुख तसेच महाराष्ट्र तत्कालीन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी भेट देऊन संगणक परीचालकांना त्या वेळेस आश्वासन दिले होते की, संगणक परिचालक यांचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते. दरम्यान त्या वेळेस विधान परिषदेत उपस्थित केलेल्या या संगणक परीचालकांच्या प्रलंबित मागणीवर माजी . मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दहा दिवसात बैठक घेऊन निर्णय देणार असल्याचे आश्वासन त्यामुळे फडणवीस यांनी दिले होते. मात्र त्या दहा दिवसांत कोणत्याही प्रकारचा निर्णय न होता संगणक परिचालकाच्या हातावर तुरा देत केवळ मनधरणी केली होती.दरम्यान , सचिव कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे की , संगणक परीचालकांना आय.टी. महामंडळात समाविष्ट करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून तीन महिन्यात संगणक परीचालकांना आय.टी. महामंडळात समाविष्ट करण्याची प्रक्रिया सुरू केली असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र अद्यापही कोणत्याही प्रकारची अंमलबजावणी शासनाकडून झालेली नसल्याने आता हीच ती वेळ म्हणत बेमुदत कामबंद आंदोलन सुरू करणार असल्याची माहिती संगणक परीचालकांनी दिली आहे.निवेदन देताना येवला तालुका संगणक परिचालक संघटनेचे अध्यक्ष सोपान सुराशे , दत्तू शेलार, शशिकांत बारहाते, अंकुश म्हस्के, शंकर भड, मनिषा गरुड, रागिणी जगताप, दत्ता मोरे, गणेश रोठे आदींसह येवला तालुक्यातील संगणक परिचालक उपस्थित होते.
"सोमवार पासून संगणक परीचालकांचे काम बंद आंदोलन चालू झाले आहे.काम बंद काळात कोण काम करते याकडे विशेष लक्ष असणार आहे. त्यामुळे काम बंद काळात कुणीही काम करू नये.आपले काम बंद आंदोलन असल्याने सर्व प्रकारचे काम हे बंद ठेवण्यात यावे. सर्वांनी प्रशासकीय ग्रुप देखील सोडले आहे. प्रशासकीय ग्रुप मध्ये कुणीही केंद्र चालक राहणार नाही. संगणक परीचालकांचा भविष्याचा प्रश्न असल्याने सर्वानी काम बंद मध्ये सहभागी होण्याचे आवाहन संगणक परिचालक संघटनेकडून करण्यात आले आहे."