नागभीड येथे जिल्हा अधिवेशन
चंद्रपूर/ प्रतिनिधी
शासनाचे धोरण व शिक्षणाप्रती असलेली अनास्था यामुळे शिक्षण व्यवस्था अस्थिर झालेली आहे. शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठी शासन संवेदनशील नाही.खाजगी आश्रम शाळांच्या माध्यमातून कर्मचार्यांचे शोषण सुरू आहे. यावर अधिकाऱ्यांचा वचक नाही. अशा स्थितीमध्ये सेवानिवृत्ती पर्यंत काम करणेही कर्मचाऱ्यांना कठीण झाले आहे.यासाठी अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी शिक्षकांनी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे हात बळकट करावे व एकसंघ होऊन लढा द्यावा. असे आवाहन माजी आमदार विश्वनाथ डायगव्हाणे यांनी नागभीड येथे केले.
विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ जिल्हा चंद्रपूर संलग्नित
अखिल भारतीय माध्यमिक शिक्षक महासंघ ,नवी दिल्ली व महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक महामंडळ, मुंबई द्वारा आयोजित जिल्हा अधिवेशन रविवार दिनांक 5 जानेवारी ला नागभीड येथे पार पडले यावेळी अध्यक्षस्थानावरून श्री डायगव्हाणे मार्गदर्शन करीत होते. निसर्गायण सभागृहात जिल्हा अधिवेशनाचे उद्घाटन प्रसिद्ध साहित्यिक डॉक्टर राजन जयस्वाल यांच्या हस्ते संपन्न झाले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार तथा महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक महामंडळ मुंबईचे अध्यक्ष विश्वनाथ डायगव्हाणे होते. प्रमुख अतिथी म्हणून प्रांतीय सरकार्यवाह सुधाकर अडबाले, जिल्हा परिषद सदस्य डॉ. सतीश वारजूरकर, मारोतराव अतकारे, जगदीश जूनघरी ,हरिभाऊ पाथोडे, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष चापले, सचिव पिसे, रामभाऊ भांडारकर,जिल्हाध्यक्ष राजेंद्र खाडे, अधिवेशन समन्वयक तथा विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष श्रीधर खेडेकर ,रमेश काकडे ,जयप्रकाश थोटे, अविनाश बढे, जिल्हाध्यक्ष केशव ठाकरे, कार्यवाह श्रीहरी शेंडे,दिगंबर कुरेकर, देवराव निब्रड ,सुनील शेरकी ,लक्ष्मण धोबे, गंगाधर कुनघाडकर, आश्रमशाळा शाखेचे दिलीप गोखरे, नगराळे, महिला आघाडी प्रमुख रायपुरे, यांची उपस्थिती होती.
अधिवेशनात विविध विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.नवीन परिभाषित अंशदायी निवृत्ती वेतन योजना व जुनी पेन्शन योजना तुलनात्मक चर्चा गरज फायदे व तोटे, शिक्षक -विद्यार्थी हीत विरोधी शासन धोरण, घातक शासन निर्णयाबाबत संघटनेची भूमिका ,महाराष्ट्र खाजगी शाळातील कर्मचारी( सेवेच्या शर्ती )विनियम, अधिनियम 1977. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती ,बदली ,अनुकंपा नेमणुका याबाबत होत असलेल्या अन्यायावर चर्चा. यासह राज्यातील विनाअनुदानित सर्व शाळा, वर्ग, तुकड्यांना अनुदान मंजूर करणे. आश्रमशाळांतील शिक्षक कर्मचाऱ्यांच्या वेतनातील अनियमितता दूर करणे. यासह इतर प्रश्नांवर मान्यवरांनी मार्गदर्शन केले. सरकार्यवाह सुधाकर अडबाले यांनी आश्रम शाळेतील आत्महत्याग्रस्त पवार कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ खंबीरपणे पाठीशी उभा राहील अशी ग्वाही दिली व दोषींवर कडक कारवाई झाली पाहिजे यासाठी आंदोलन उभारण्याची इशारा दिला. शिक्षकाने एकजूट होऊन लढा द्यावा असे आवाहन याप्रसंगी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा कार्यवाह श्रीहरी शेंडे यांनी केले. संचालन सतीश मेश्राम ,अलका ठाकरे यांनी केले. आभार प्रदर्शन जिल्हाध्यक्ष केशव ठाकरे यांनी मानले.
अधिवेशनाला जिल्ह्यातील मोठ्या संख्येने शिक्षक सहभागी झाले होते. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी नागभीड तालुक्याचे अध्यक्ष प्रवीण नाकाडे, सचिव सतीश मेश्राम सर्व सदस्याने सहकार्य केले.
उद्घाटक डॉक्टर राजन जयस्वाल मिश्कील कोपरखळी
उद्घाटन भाषणात प्रसिद्ध साहित्यिक राजन जयस्वाल यांनी शिक्षण व्यवस्थेवर मिश्किल टिप्पणी केली .मागील पाच वर्षात शिक्षण क्षेत्र विनोदाच्या तावडीत सापडले होते .आता मात्र सुटका झालेली आहे. शिक्षण क्षेत्रात शिक्षक यांच्या समस्येसाठी लढणारी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघटना ही लढवयी संघटना आहे .या संघटनेच्या कार्यक्रमात उपस्थित राहियला मला नेहमीच आवडेल. यासाठी संघटनेने आवाज द्यावा मी नेहमीच येईन ,नेहमीच येईन, नेहमीच येईन असे म्हणत उद्घाटन भाषण संपविले .यावेळी प्रचंड हशा निर्माण झाला.