नागपूर/प्रतिनिधी:
आजपासून येथे सुरु झालेल्या महावितरणच्या ३ दिवसीय राज्य स्तरीय क्रीडा स्पर्धेत यजमान नागपूर संघाने व्हॉलीबॉल, खो-खो स्पर्धेत विजयी सलामी दिली. रवीनगर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या मैदानावर आयोजित या स्पर्धा होत आहेत.
आज झालेल्या व्हॉलीबॉल स्पर्धेतील पहिल्या सामन्यात यजमान नागपूर संघाने पुणे-बारामती संघाचा २५-१८, २५-१२ गुणांनी पराभव केला. नागपूर संघाकडून पियुष गोसेवडे, स्नेहल मेहरखेड यांचा खेळ उत्कृत्ष्ट झाला.
अन्य एका सामन्यात नांदेड परिमंडलाने अमरावती-अकोला परिमंडलाचा २५-१४,२५-२३ गन फरकाने पराभव केला. नांदेड परिमंडलाकडून सय्यद मोबीन, पवन सूर्यवंशी, गजानन नीलपत्रेवार यांचा खेळ उत्कृष्ट झाला.
कब्बडी
पुरुषांच्या कब्बडी स्पर्धेत भांडुप-रत्नागिरी परिमंडळाने औरंगाबाद-जळगाव परिमंडळाचा २८-१५, २९-१० गुणांनी पराभव केला. भांडुप परिमंडलाने पहिल्या डावात २ बोनस गुणाची तर दुसऱ्या डावात औरंगाबाद परिमंडलाने १ बोनस गुणाची नोंद केली. भांडुप-रत्नागिरी परिमंडलाकडून निखिल पटले आणि सुरेश गुंजाळ यांचे विजयात महत्वाचे योगदान राहिले.
खो-खो
खो-खो स्पर्धेत भांडुप परिमंडलाने कल्याण परिमंडलाचा १ डाव ६ गडी राखून पराभव केला. दुसऱ्या अन्य एका सामन्यात पुणे परिमंडलाने लातूर परिमंडलाचा १ डाव १५ गाडी राखून पराभव केला. कॊल्हापूर विरुद्ध औरंगाबाद संघ दरम्यान झालेल्या सामन्यात कोल्हापूर संघाने १ डाव ६ गाडी राखत विजय मिळवला. यजमान नागपूर संघाने अमरावती संघाचा १ गाडी आणि अडीच मिनिटे शिल्लक ठेवत विजय संपादन केला. खो-खो महिला गटात नागपूर संघाला लातूर संघाकडून पुढे चाल मिळाली.
मैदानी स्पर्धा
महिलांच्या १०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत मुख्य कार्यालय, मुंबईची स्पर्धक प्रिया पाटीलने १४.८ सेकंदाची वेळ नोंदवत पहिला क्रमांक पटकवला. कल्याण परिमंडलाच्या नम्रता राजपूतने १५ . ६३ सेकंदाची वेळ नोंदवत दुसरा क्रमांक पटकावला. पुरुषांच्या उंच उडी स्पर्धेत औरंगाबाद परिमंडलाच्या चेतन केदारने १. ४५ मीटर उडी मारत पहिला क्रमांक तर लातूर परिमंडलाच्या जाकीर अलीने १ . ४० मीटर उडी मारत दुसरा क्रमांक पटकावला. महिलांच्या उंच उडी स्पर्धेत नागपूरच्या सरिता सोरटे आणि कोल्हापूरच्या अश्विनी देसाई यांनी १. १० मीटर उडी मारली. अखेर नाणेफेक करून निकाल जाहीर करण्यात आला यात नागपूरच्या सरिता सोरटेला विजयी घोषित करण्यात आले.
पुरुषांच्या लांब उडी स्पर्धेत औरंगाबादच्या चेतन केदार आणि लातूरच्या जाकीर अली यांनी ५. ३३ मीटर उडी मारली. नाणेफेक करून निकाल जाहीर करण्यात आला यात औरंगाबादच्या चेतन केदारला विजयी घोषित करण्यात आले. महिलांच्या स्पर्धेत नागपूरच्या सरिता सोरतेने ३ . ७७ मीटर उडी मारत पहिला क्रमांक पटकावला. मुख्य कार्यालयाच्या प्रिया पाटीलने ३ . ३८ मीटर उडी मारत दुसरा क्रमांक पटकावला.
पुरुषांच्या गोळाफेक स्पर्धेत पुणे परिमंडलाच्या प्रवीण बोरावकेने १०. ६२ मीटर गोळाफेक करीत पहिला क्रमांक तर कोल्हापूर परिमंडलाच्या इम्रान मुजावरने १०. २५ मीटर गोळाफेक करीत दुसरा क्रमांक पटकावला. महिला गटात कोल्हापूरच्या विजया माळीने ७. ७१ मीटर गोळाफेक करीत पहिला तर कल्याण परिमंडलाच्या हर्षला मोरेने ७. ०९ मीटर गोळाफेक करीत दुसरा क्रमांक पटकावला.