नागपूर/ प्रतिनिधी:
महावितरणने वीजदरांबाबतचा प्रस्ताव विद्युत नियामक आयोगाकडे सादर केला असून या प्रस्तावात सर्वसामान्य ग्राहकांवर बोजा पडणार नाही याची काळजी घेतली जाईल, अशी ग्वाही राज्याचे ऊर्जामंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. डॉ. नितीन राऊत यांनी आज नागपुरात पत्रकार परिषदेत दिली.
महावितरणने वीजदराबाबतचा प्रस्ताव राज्य विद्युत नियामक आयोगाकडे सादर केला आहे. वीज दरा बाबत निर्णय घेण्याच्या अधिकार पूर्णतः आयोगाकडे आहे .जनसुनावणीनंतर या बाबत अंतिम निर्णय घेतला जातो. या प्रस्तावात सर्वसामान्य वीज ग्राहकांवर बोजा पडणार नाही, याची खबरदारी घेतली जाईल अशी ग्वाही ऊर्जामंत्री ना. डॉ. नितीन राऊत यांनी दिली.
दरवाढ संतुलित ठेवण्यासाठी सुद्धा प्रयत्न केले जातील असे स्पष्ट करून कोळसा व इतर कारणांमुळे विजेचेही दर वाढवावे लागतात, असेही त्यांनी सांगितले. सौर ऊर्जेबाबत सौर ग्राहक आणि सौर उत्पादक यांच्यावर अन्याय होऊ देणार नाही,असेही ऊर्जामंत्री म्हणाले. विदर्भात विजेचे दर कमी करण्याबाबतच्या प्रस्तावावावर सकारात्मक विचार करण्यात येईल, असेही ऊर्जामंत्री म्हणाले.
नागपूर विकासाचे मॉडेल
नागपूरचा विकास हा आपल्या जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यामुळे नागपूर साठी विकासाचे मॉडेल ठरविले आहे असे सांगून या बाबत पालकमंत्री ना. डॉ. नितीन राऊत यांनी विविध अभिनव संकल्पना मांडल्या. पर्यटनाच्या दृष्टीने नागपूर शहर हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे केंद्र होऊ शकते, त्यादृष्टीने फुटाळा येथे बुद्धिस्ट थीम पार्कच्या माध्यमातून जगातील पर्यटकांना आकर्षित करता येईल व त्यामुळे येथील विकासाला मोठ्या प्रमाणात चालना मिळेल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉरिडॉर तयार करण्याचा मानस यावेळी पालकमंत्र्यांनी व्यक्त केला.
भूमिपुत्रांना रोजगार मिळावा यासाठी उद्योग आणावे लागतील यासोबतच भूमिपुत्रांमध्ये कौशल्य विकसित करून रोजगारांच्या संधी उपलब्ध करून देता येतील यासाठी आवश्यक प्रशिक्षण केंद्रे सुरू करण्यात येतील, अशीही माहिती त्यांनी यावेळी दिली. नागपूर येथील भारतीय प्रशासनिक सेवा प्रशिक्षणचा कालावधी दोन वर्षाचा करणार असून या ठिकाणी अद्ययावत ग्रंथालय व डिजिटल क्लासरूम उभारण्यात येतील,असेही त्यांनी यावेळी सांगितले. मराठवाडा विभागा प्रमाणे लवकरच माननिय मुख्यमंत्री विदर्भाची आढावा बैठक घेणार आहेत, अशीही माहिती ना. राऊत यांनी यावेळी दिली
यावेळी मंचावर अनिल नगराळे, राजा करवाडे, प्रभाकर दुपारी, संजय दुबे तसेच पत्रकार संघाचे पदाधिकारी प्रदीप मैत्र, राहुल पांडे प्रामुख्याने उपस्थित होते