अमरावती:
चांदूर बाजार येथील पशुवैद्यकीय अधिकारी मुख्यालयी राहत नसल्याने शेतकऱ्याची १६ हजार रुपये किमतीची शेळी दगावली. या प्रकाराने चिडलेल्या शेतकऱ्याने मृत शेळी अमरावती येथील पशुसंवर्धन सहउपायुक्त राजेंद्र पेठे यांच्या चेंबरमध्ये आणली.रवि पाटील असे आंदोलक शेतकऱ्याचे नाव आहे .
चांदुर बाजार तालुक्यातील बेसखेडा येथे रवि पाटील यांच्या मालकीचे गोटफार्म आहे. या ठिकाणी असलेल्या शेळ्यांपैकी एक, राजस्थान येथून आणलेली १६ हजार रुपये किमतीची शेळी आजारी पडली. तिच्यावर बेलोरा व चांदूर बाजार येथील पशुदवाखान्यात उपचारासाठी आणले.
सदर शेळीची प्रकृती अधिकच खराब झाल्यामुळे पाटील यांनी पशुसंवर्धन अधिकाऱ्यांशी संपर्क केला. मात्र, कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही.
अधिकारीच मुख्यालयी राहत नसल्याने शेळी दगावल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे.