कलादालन संगीत अकादमीची शानदार प्रस्तुती
नागपूर/प्रतिनिधी
कलादालन संगीत अकादमी ही संगीत संस्था विदर्भात नाट्य, संगीत आदी कलात्मक क्षेत्रात वाढ व्हावी, विदर्भातील कलाकारांना मुंबई-पुण्याकडेही कार्यक्रम सादर करता यावे, या उद्देशाने सुरू करण्यात आली असून संगीत, नाट्य व वादन आदींचे शिक्षण अकादमीत दिले जाते सोबतच कलादालन संगीत शिष्यवृत्ती आणि निवडक गरजू, गुणी कलाकारांना कलादालन कला शिष्यवृत्ती देण्यात येते.
कलादालन संगीत अकादमी व अॅडव्हान्स हेल्थ क्लिनिक आयोजित आणि कलादालनच्या सागर मधुमटके फॅन्स क्लबद्वारे प्रस्तुत ‘सुरों के एकलव्य’ हा सुमधूर गीतांचा कार्यक्रम गुरुवार, 22 नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे. सुप्रसिद़ध गायिका लता मंगेशकर, आशा भोसले यांच्या गीतांसोबतच किशोर कुमार यांचे मस्तीभरे गीत, शैलेंद्र यांची सुमधूर गीते आणि मराठी गीतांचा तडका या कार्यक्रमात रसिकांना अनुभवायला मिळणार आहे. डॉ. वसंतराव देशपांडे सभागृह, सिव्हील लाइन्स येथे सायंकाळी 7 वाजता हा कार्यक्रम होईल, अशी माहिती कलादालनच्या संयोजिका माधवी पांडे यांनी पत्रकारपरिषदेत दिली.
कार्यक्रमाचे संयोजक माधवी पांडे, डॉ. रवी वैरागडे व विजय जथे हे आहेत. माधवी पांडे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या कार्यक्रमाचे संगीत संयोजन आनंद मास्टे यांनी केले आहे. निवेदन नासीर खान करणार आहेत.
सागर मधुमटके, प्रशांत वलिवकर, सारंग जोशी या गायकांसह नीता के-हाळकर, अनुष्का काळे व सानिका ठाकूर या गायिका विविध गीते सादर करतील. या कार्यक्रमातील सर्व गायकांनी एकलव्यासारखी संगीताची तपस्या केली असून त्यांनी कोणतेही विधीवत शिक्षण घेतले नाही. हे कलाकार भविष्यात नागपूरच्या संगीत क्षेत्रात पुढे यावे आणि भविष्यात त्यांनी चांगले नाव कमवावे, अशी आमची इच्छा आहे असे माधवी पांडे यांनी पत्रकारपरिषदेत सांगितले. संगीत हे सगळ्या रोगांना लाभदायी असते, असे डॉ. वैरागडे म्हणाले. संगीत हे गोळ्यांइतकेच हिलिंगचे काम करते. आरोग्य चांगले हवे असेल तर चांगल्या गायकांची गाणी ऐका, आजाराचा जास्त ताण घेऊ नका, आनंदी रहा, त्याचाही सकारात्मक परिणाम तब्येतीवर होतो, असे डॉ. वैरागडे म्हणाले. आरोग्य आणि संगीत यांचा जर मिलाफ झाला तर तुम्ही आनंदी जीवन जगू शकता. म्हणूनच आम्ही या कार्यक्रमाशी जोडलो गेलो, असे ते म्हणाले.