महापौर नंदा जिचकार यांचा पुढाकार : स्वत: करीत आहेत नागरिकांशी संपर्क
नागपूर,ता. २४ : वृक्ष लागवड आणि वृक्ष संवर्धनासाठी नागरिकांनी स्वत: पुढाकार घेऊन चळवळ उभारावी, जलसंवर्धनाचे मोठे कार्य नागपुरात व्हावे, यासाठी महापौर नंदा जिचकार यांनी स्वत: पुढाकार घेऊन महापौर वृक्षमित्र आणि जलमित्र ही संकल्पना मांडली. त्या स्वत: आता नागपुरातील विविध भागात जाऊन नागरिकांशी संवाद साधत आहेत आणि चळवळीत सहभागी होण्याचे आवाहन करीत आहेत. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत चळवळीत सहभागी होण्यासाठी पुढाकार घेतलेल्या उत्तर आणि दक्षिण नागपुरातील नागरिकांना महापौर नंदा जिचकार यांनी ओळखपत्रांचे वाटप केले.
यावेळी नगरसेविका प्रमिला मंथरानी,प्रगती पाटील, उज्ज्वला शर्मा, अर्चना पाठक यांच्यासह भाजप पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. उत्तर नागपुरात सिंध मुक्ती संघठनने यासाठी पुढाकार घेतला असून महापौरांच्या या संकल्पनेला विविध स्तरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. वृक्षसंवर्धन आणि जलसंवर्धनासाठी नागपुरातून सुरू झालेली ही चळवळ संपूर्ण देशासाठी आदर्श ठरेल, असा विश्वास यावेळी महापौर नंदा जिचकार यांनी व्यक्त केला. नागरिकांनी मोठ्या प्रमाणात या चळवळीत सहभागी होण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.