मिशन शौर्य मध्ये आदिवासी आश्रम शाळेच्या पुन्हा दोन चंद्रपूरकरांनी एव्हरेस्ट केले सर
अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी महाराष्ट्रातील ९ गिर्यारोहकांचे केले स्वागत,अभिनंदन
चंद्रपूर/प्रतिनिधी:
राज्याचे वित्त, नियोजन व वने मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सुरू केलेल्या मिशन शौर्य या उपक्रमास दुसर्या वर्षीही यश मिळाले. आदिवासी विकास विभागाने यावर्षी निवड केलेल्या अकरा विद्यार्थ्यांपैकी नऊ जणांनी एव्हरेस्ट सर केले असून यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील दोन आदिवासी मुलांचा समावेश आहे.
शासकीय आश्रम शाळा जिवती येथील अंतुबाई कोटनाके, शासकीय आश्रम शाळा देवाडा चंद्रपूर येथील सुरज आडे, असे या दोन विद्यार्थ्यांचे नाव आहे. केतन जाधव पालघर, अनिल कुंदे नाशिक, हेमलता गायकवाड नाशिक, चंद्रकला गावित धुळे, मनोहर हीलिम नाशिक, सुषमा मोरे यवतमाळ, सुग्रीव मुंदे अमरावती,शिवचरण मिलावेकर अमरावती, मुन्ना धिकार, अमरावती अशी अन्य सात यशस्वी मुलांची यादी आहे.
गेल्या वर्षी सुरू करण्यात आलेल्या मिशन शौर्य मध्ये एकट्या चंद्रपूर जिल्ह्यातील आश्रमशाळांमधील दहा विद्यार्थ्यांनी एवरेस्ट कडे कूच केले होते.त्यापैकी पाच विद्यार्थ्यांनी एव्हरेस्ट सर करण्यात यशस्विता मिळवली होती. पालक मंत्री सुधीर मुनगंटीवार व तत्कालीन जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांच्या कल्पनेतून ही योजना पुढे आली. आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांनी ही कल्पना उचलून धरली व त्यानंतर मिशन शौर्य आता आदिवासी विकास विभागाचा एक अभिनव उपक्रम झाला आहे.
आदिवासी विकास विभागामार्फत या वर्षी निवड केलेल्या विद्यार्थ्यांमध्ये महाराष्ट्रातील सर्व आदिवासी आश्रम शाळांचा सहभाग होता. त्यापैकी वरील आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे. आदिवासी विकास विभागाने मिशन शौर्याला दुसऱ्या वर्षीही सलग चालना दिल्याबद्दल त्यांनी विभागाचे कौतुक केले आहे. चंद्रपूर गडचिरोली सारख्या आदिवासी बहुल भागातील विद्यार्थ्यांच्या उपजत काटक पणाला व कलागुणांना वाव देण्यासाठी मिशन शौर्य हे अतिशय पूरक ठरले आहे .चंद्रपूर जिल्ह्यामध्ये याच धर्तीवर विविध क्रीडा प्रकारांमध्ये विद्यार्थ्यांच्या उपजत काटकपणाला चालना देण्यासाठी मिशन शक्ती सुरू करण्यात आले आहे.पालक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या नियोजनात 2024 च्या ऑलिम्पिकसाठी मिशन शक्ती अंतर्गत निवडक क्रीडा प्रकारांमध्ये मुलांना प्राविण्य दिले जात आहे. राज्यातील विद्यार्थ्यांच्या या सलग यशाबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला आहे. या अभियानात याहीवर्षी चंद्रपूरच्या दोन मुलांनी यशस्वी सहभाग घेतल्याबद्दल त्यांचे विशेष अभिनंदन सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे.