उमेश तिवारी/कारंजा (घाडगे):
कारंजा येथील संवेदना युवा मंच या सामाजिक ग्रुप ने समाजसेवेचा एक नवा ध्यास घेतला आहे. फक्त गावपातळीवर असलेल्या पाणी फाउंडेशन च्या वाॅटर कप स्पर्धेच्या धरतीवर कारंजा शहरात सुद्धा पाणी प्रश्न मिटावा यासाठी जलसंधारणाचं काम करण्याचं या ग्रुप ने ठरवलं. आणि कारंजा चे ग्रामदैवत श्री संत लटारे महाराज यांच्या पुण्यतिथी च्या पर्वावर 'पाणी अडवा, पाणी जिरवा' या मोहिमेला सुरुवात केली.
सध्या संपुर्ण महाराष्ट्र पाणी समस्येशी झगडत आहे. कारंजा शहर सुद्धा याच परिस्थितीतून जात आहे. खैरी धरणातील पाणीसाठा अगदी कमी झाला आहे.
पाणी फाउंडेशन तर्फे आयोजित वाटर कप स्पर्धेत शहराला सहभागी होण्याची काही योजना नाही. परंतु भविष्यात कारंजा शहरातील भु-जल पातळी वाढविण्यासाठी वाॅटर कप स्पर्धेत सहभागी असलेल्या गावांसारखं जलसंधारणाचं काम करण्याचं शहराच्या वतीनं संवेदना युवा मंच ने ठरवलं.
त्यादृष्टीने श्री संत लटारे महाराज पुण्यतिथी च्या पावन पर्वावर शहरवासीयांच्या मदतीने दि. १९/०५/२०१९ ते २८/०५/२०१९ भु-जल पातळी वाढविण्यासाठी 'पाणी अडवा, पाणी जिरवा' मोहिमेअंतर्गत श्री विठ्ठल टेकडी जवळ च्या परिसरात सकाळी 6.00 ते 10.00 ला जल-संधारणासाठी श्रमदान करण्याचे काम अविरतपणे चालू आहे. शहरातील नागरिक सुद्धा श्रमदानात उत्स्फुर्तपणे सहभागी होत आहेत.
आज आपण या श्रमदानात केलेल्या छोट्याशा मदतीमुळे पाणी प्रश्न मिटविण्यासाठी व पर्यायाने उज्वल भविष्यासाठी मदत होईल. यासाठी शहरवासीयांनी आपले कर्तव्य म्हणून या श्रमदानात सहभागी होऊन उद्याच्या उज्ज्वल जलमय भविष्यासाठी हातभार लावावा व जेसीबी च्या कामाकरिता शक्य ती आर्थिक मदत करावी, अशी विनंती संवेदना युवा मंच च्या वतीने करण्यात आली.
यासोबतच वाटर कप स्पर्धेत सहभागी असलेल्या गावातील जल-संधारणाचं प्रशिक्षण घेतलेल्या व्यक्ती (वॉटर हिरो) व तालुक्यातील नोंदणीकृत जलमित्र तसेच शाळा, महाविद्यालये, मंदिर व्यवस्थापन, व्यापारी संघटना, सामाजिक संस्था-संघटना यांनी सुद्धा श्रमदानात सहभागी व्हावं, अशी विनंती संवेदना युवा मंच ने केली आहे.