चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राचा विक्रम खापरखेडा
औष्णिक विद्युत केंद्राने काढला मोडीत
नागपूर/प्रतिनिधी:
महानिर्मितीच्या खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्रातील ५०० मेगावॅट क्षमतेच्या संच क्रमांक ५ ने सलग १७२.५४ दिवस वीज उत्पादनाचा नवा कीर्तिमान आज दुपारी १२ वाजून ५ मिनीटांनी प्रस्थापित केला आहे. हा संच ३० नोव्हेंबर २०१८ रोजी कार्यन्वित करण्यात आला होता व तेंव्हापासून आजपर्यंत ह्या संचामधून अखंडित वीज उत्पादन सुरू आहे.
महानिर्मितीचे चंद्रपूर, खापरखेडा आणि भुसावळ येथे ५०० मेगावॅट क्षमतेचे एकूण ८ संच राज्यभरात कार्यरत आहेत. ५०० मेगावॅट क्षमतेच्या या आठ संचांपैकी चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रातील संच क्रमांक ७ च्या नावे १७२.५ दिवस सलग वीज उत्पादनाचा विक्रम होता तो विक्रम आज खापरखेडा येथील संच क्रमांक ५ ने तोडला आहे.खापरखेडा संच क्रमांक ५ मधून सध्या ९६ टक्के भारांकासह वीज उत्पादन सुरु असल्याचे मुख्य अभियंता श्री. राजेश पाटील यांनी सांगितले.
महानिर्मितीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक श्री. अरविंद सिंग, संचालक(संचलन) श्री. चंद्रकांत थोटवे आणि वरिष्ठ व्यवस्थापनाचे वेळोवेळी सहकार्य तथा मार्गदर्शन लाभत असल्याचे गौरवोद्गार श्री. राजेश पाटील यांनी काढले.
श्री. राजेश पाटील यांनी ५०० मेगावॅट संच क्रमांक ५ चे उप मुख्य अभियंता श्री. राजेंद्र राऊत, अधिकारी-विभाग प्रमुख-अभियंता-तंत्रज्ञ-कर्मचारी- कर्मचारी संघटना प्रतिनिधी व संपूर्ण टीम ५०० मेगावॅट खापरखेडाचे हार्दिक अभिनंदन केले आहे. कडक उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर विजेची वाढती मागणी लक्षात घेता संच क्रमांक ५ मधून २०० दिवस अखंडित वीज उत्पादनाचे लक्ष्य गाठण्यासाठी त्यांनी संबंधितांना शुभेच्छा दिल्या.