- वेतन पथक अधिक्षक वाघमारे यांची ग्वाही
- विदर्भ प्राथमिक शिक्षक संघाचा पुढाकार
नागपूर - टिईटी अपात्र शिक्षकांचे वेतन तूर्तास थांबणार नसल्याची ग्वाही वेतन पथक अधिक्षक श्री निलेशकुमार वाघमारे यांनी दिली. विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर तर्फे यासंदर्भात मागणी करण्यात आली होती.
विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर (प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघ) तर्फे सातत्याने माहे आँगस्ट 2018 पासून टिईटी अपात्र शिक्षकांना सेवेत कायम ठेवून त्यांचे वेतन विनाअडथळा सुरू ठेवण्यासाठी लढा दिला आहे.
या विषयावर विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर तर्फे संस्थापक मार्गदर्शक व शिक्षक नेते तथा शिक्षण मंडळाचे माजी सदस्य मा श्री मिलिंद वानखेडे सरांच्या नेतृत्वात मानव संसाधन विकास मंत्रालय दिल्ली, मा. मुख्यमंत्री, महामहिम राष्ट्रपतींना पत्रव्यवहार, शिक्षण आयुक्त, शिक्षण सचिव, शिक्षण सहसंचालक, शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी, वेतन पथक अधिक्षक व न्यायालय अशा चौफेर बाजूने विषयाला जिवंत ठेवत शिक्षकांच्या हितार्थ न्याय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केला जात आहे.
30 मार्च 2019 पर्यंत टिईटी पात्रता परिक्षा उत्तीर्ण नसलेल्या शिक्षकांचे वेतन थांबविण्याची कार्यवाही वेतन पथक अधिक्षकां मार्फत सुरू करण्यात आली आहे. या कार्यवाहीला विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर तर्फे विरोध करण्यात आला आहे. या विषयावर शनिवार (ता 4) शिक्षक नेते श्री मिलिंद वानखेडे सरांनी शिक्षण आयुक्त व शिक्षण सचिव यांच्यासोबत भ्रमणध्वनीवर संपर्क साधून टिईटी अपात्र शिक्षकांच्या विरोधात घेतलेली कार्यवाही तातडीने थांबवून शिक्षकांना वेतन अदा करण्याची आग्रही मागणी केली. यासंदर्भात 6 जून 2019 रोजी उच्च न्यायालय नागपूर येथे टिईटीच्या सर्व विषयांची एकत्रितपणे सुनावणी होणार आहे. तोपर्यंत तूर्तास टिईटी अपात्र शिक्षकांचे वेतन अदा होणार असल्याची ग्वाही वेतन पथक अधिक्षक श्री निलेशकुमार वाघमारे यांनी दिली.
यावेळी शिक्षक नेते मिलिंद वानखेडे, नागपूर विभागीय सचिव खिमेश बढिये, जिल्हा ग्रामीण संघटक गणेश खोब्रागडे, शहर संघटक समीर काळे, रविकांत गेडाम, माध्यमिक विभाग संघटक राजू हारगुडे, अमोल राठोड, अंकुश कडू, प्रकाश खडतकर, श्री कळसकर, प्रवीण पारखी यांच्यासह विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूरचे शिलेदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.