चंद्रपूर - सोमवार २२ एप्रिल रोजी चंद्रपूर शहर महानगरपालिकेत आयुक्त संजय काकडे यांच्या अध्यक्षतेखाली पाणीपुरवठयासंबंधी बैठक संपन्न झाली. बैठकीदरम्यान शहरात पाण्याचा मुबलक पुरवठा होत असतांना काही भागात टिल्लूपम्पमुळे पाणीपुरवठ्याची समस्या उद्भवत असल्याचे लक्षात आल्याने यापुढे कोणीही अतिरिक्त पाण्यासाठी टिल्लूपंपचा वापर करतांना आढळल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश आयुक्त श्री. संजय काकडे यांनी दिले आहेत.
शहरातील काही भागात भेडसावणारी पाणीसमस्या सोडविण्यासाठी चंद्रपूर शहर महानगरपालिकेने टिल्लूपंप जप्तीची मोहीम हाती घेतली आहे. टिल्लूपंपचा सर्रासपणे वापर करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत असून पालिकेच्या वतीने विवेक नगर, रहमत नगर अश्या शहराच्या विविध परिसरातून २५ ते ३० टिल्लूपंप जप्त करून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. शहरात अनेक ठिकाणी अतिरिक्त पाणी मिळावे म्हणून काही नागरिक सर्रासपणे टिल्लूपंपचा वापर करतात त्यामुळे शहरात अनेक भागांचा पाणीपुरवठा विस्कळीत होऊन बऱ्याच जणांना पाणीच मिळत नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे संपूर्ण शहरात भागात ही मोटर जप्तीची मोहीम राबविली जात आहे.
जप्त केलेल्यांनी पुन्हा मोटरीचा वापर केल्याचे आढळून आल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. पाण्याचा मुबलक पुरवठा असला तरी काही जणांमुळे सर्वांना पाणी मिळत नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे चंद्रपूर शहरातील नागरिकांनी यापुढे टिल्लूपंपचा वापर करू नये, असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.
पाण्याची बचत करणे गरजेचे आहे. अतिरिक्त पाणी मिळावे म्हणून काही नागरिक सर्रासपणे टिल्लूपंपचा वापर करतात. मोटारी धुणे, इमारतींवर पाणी मारणे अश्या गोष्टी नागरिकांनी टाळून आपणहून पाण्याचा अपव्यय टाळणे अपेक्षित आहे. पुढील काही दिवसात पाणीपुरवठा सुरळीत करण्यास टिल्लूपंप जप्तीची कारवाई करणे गरजेचे आहे. शेवटी सर्वांना पाणी मिळायला हवे. - श्री. संजय काकडे, आयुक्त, चंद्रपूर शहर महानगरपालिका.