चंद्रपूर दि. 23 एप्रिल: महाराष्ट्र शासनाच्या वनविभागाने 50 कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प ठेवलेला असून चंद्रपूर जिल्ह्याचे वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून यावर्षीच्या 33 कोटी वृक्ष लागवड अभियाना संदर्भात जिल्ह्याचा विभाग निहाय आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आज दिनांक 23 एप्रिल 2019 ला जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली.
महाराष्ट्र वन विभागाने 50 कोटी वृक्ष लागवडीचे लक्ष ठेवलेले होते. यामध्ये वर्ष2016 साली दोन कोटी वृक्ष लागवड तर 2017 साली चार कोटी वृक्ष लागवड करण्यात आली होती. तसेच 2018 साली 13 कोटी वृक्ष लागवड करण्यात आली होती. तसेच या वर्षीही वृक्षांची लागवड करण्याची मोहीम येत्या 1जुलैपासून सुरू होणार आहे. वनविभागाने यावर्षी 33 कोटी वृक्ष लागवडीचे उदिष्ट जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर या 3 महिन्यात साध्य करण्यासाठी जिल्हानिहाय उद्दिष्टे ठरवून दिली आहे. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एकूण 13 लक्ष 87 हजार 800 वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत ठेवण्यात आलेले आहे. यामध्ये जिल्हाप्रशासनातील सर्व विभागांना जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष वाटून दिलेले असून साध्य व शिल्लक उद्दिष्टांचा आढावा यावेळी जिल्हाधिकारी यांनी घेतला. तसेच शिल्लक लक्षांक पूर्ण करून त्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाला 25 एप्रिल पर्यंत सादर करावी अशा सूचना त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिली. या 33 कोटी वृक्षलागवड मोहिमेत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शासकीय तथा खाजगी संस्थांची जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत दखल घेतल्या जाईल अशी ग्वाही यावेळी त्यांनी दिली.
सोबतच या बैठकीत कन्या वन समृद्धी योजनेचा आढावा घेण्यात आला. या बैठकीला वनविभाग, महावितरण विभाग, आदिवासी विभाग आणि इतर विभागाचे अधिकारी उपस्थिती होती.