Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, एप्रिल १६, २०१९

अकारण वृक्ष छाटणीस आळा घालण्यासाठी मनपाचे पाऊल



वृक्ष छाटणीसंदर्भात मनपातर्फे नऊ मार्गदर्शक सूचना जारी

नागपूर,ता. १६ : अनेकदा नागरिकांकडून किरकोळ कारणांसाठी वृक्ष कापणीची परवानगी मागितली जाते. अंशत: छाटणीची परवानगी मिळाल्यानंतरही अनेकदा प्रत्यक्ष छाटणी अशा प्रकारे केली जाते की संपूर्ण वृक्षांचे अस्तित्वच धोक्यात येते. या सर्व विषयांवर मनपाने गंभीर पावले उचलली असून वृक्ष छाटणीसंदर्भात नऊ मार्गदर्शक सूचनाच (Standard Operating Procedure) जारी केल्या. या सर्व सूचनांचे पालन करण्याचे आवाहन आयुक्त अभिजीत बांगर यांनी नागरिकांना केले आहे.

नागपुरातील पर्यावरण क्षेत्रात कार्य करणाऱ्या ग्रीन व्हिजील फाऊंडेशनने नागपुरातील झाडांचे अस्तित्व धोक्यात आल्याची बाब मनपा आयुक्त अभिजीत बांगर यांच्या लक्षात आणून दिली. यासंदर्भात झालेल्या चर्चेत नागरिकांतर्फे छाटणीच्या नावावर होत असलेली झाडांची कटाई आणि सिमेंट रस्ते बांधकामादरम्यान झाडांभोवती न सोडलेली जागा यावर ग्रीन व्हिजील फाऊंडेशनचे संस्थापक कौस्तभ चॅटर्जी यांच्यासोबत काही दिवसांपूर्वीच आयुक्त अभिजीत बांगर यांनी चर्चा केली. त्यावेळी अतिरिक्त आयुक्त राम जोशी, अतिरिक्त आयुक्त अझीझ शेख यांचीही उपस्थिती होती. मुद्याचे गांभीर्य लक्षात घेता आयुक्तांनी झाडे छाटणीसंदर्भात मार्गदर्शक सूचना तयार करण्याचे निर्देश दिले होते. याच निर्देशानंतर मनपाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. सदर मार्गदर्शक सूचनांनुसार आता कोणत्याही प्रकारच्या वृक्ष छाटणीसाठी केवळ अपरिहार्य परिस्थितीमध्येच परवानगी दिली जाईल. अर्जासोबत वृक्षांचे सर्व बाजूने घेतलेले कमीत कमी चार रंगीत छायाचित्र सादर करावे लागतील. नवीन बांधकामाचे नियोजन करताना भूखंडावर अस्तित्वात असलेल्या वृक्षांचे स्थान विचारात घेऊन शक्यतोवर सदर वृक्ष छाटणीची आवश्यकता पडणार नाही, अशा पद्धतीने नकाशा तयार करण्यात यावा. जर अस्तित्वातील वृक्षांमुळे नियोजित बांधकामामध्ये अडचण निर्माण होत आहे, या कारणामुळे संपूर्ण/अंशत: छाटणी प्रस्तावित असेल तर अर्जासोबत बांधकाम नकाशा सादर करावा. सदर नकाशावर वृक्षांचे स्थान सुस्पष्टपणे दर्शवावे व वृक्षांमुळे बांधकाम करण्यामध्ये कशाप्रकारे अडचण होते, हे नकाशावर सुस्पष्ट नमूद करुन रेखांकित करावे. अशंत: छाटणी करण्याच्या प्रकरणामध्ये वृक्षांचा जो भाग छाटणी करावयाचा आहे, तो भाग छायाचित्रावर रेखांकित करून सुस्पष्टपणे दर्शविण्यात यावा. किरकोळ स्वरूपाच्ळा कारणासाठी वृक्षांच्या छाटणीकरिता परवानगी अनुज्ञेय राहणार नाही. कोणत्याही वृक्षांच्या संपूर्ण छाटणीसाठी परवानगी देण्यापूर्वी एकास पाच या प्रमाणे नवीन वृक्षांची लागवड करणे आवश्यक आहे. व्यावसायिक बांधकामाकरिता कोणत्याही वृक्षाच्या संपूर्ण छाटणीसाठी परवानगी देण्यापूर्वी एकास दहा या प्रमाणे नवीन वृक्षांची लागवड करणे आवश्यक आहे. नवीन वृक्ष लागवड करताना किमान सहा फूट उंचीचे वृक्ष लागवड करणे आवश्यक राहील. या पद्धतीने नवीन वृक्ष लागवड केल्याशिवाय संपूर्ण वृक्ष छटाईची परवानगी दिली जाणार नाही. सदर वृक्षाचे जतन, संगोपन व संरक्षण करण्याची उपाययोजना करण्याची जबाबदारीही अर्जदाराची राहील. नागपूर महानगरपालिकेमार्फ वृक्ष छाटणीचे अर्ज सादर करण्याकरिता मोबाईल ॲप तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सदर मोबाईल ॲप वापरात आल्यानंतर लागवड केलेल्या नवीन वृक्षांचे छायाचित्र जीपीएस लोकेशनसहीत मोबाईल ॲपद्वारे सादर करणे आवश्यक राहील, असे मार्गदर्शक सूचनांमध्ये म्हटले आहे.

सिमेंट रस्त्यांमध्ये अडकलेली झाडे मोकळी करण्याचे निर्देश
मनपा मुख्यालयातील आयुक्त सभागृहात सोमवारी (ता. १५) झालेल्या बैठकीत शहरातील सिमेंट रस्त्यांच्या बांधकामादरम्यान ज्या झाडांभोवती जागा सोडलेली नाही अशा झाडांभोवती तातडीने जागा करण्याचे निर्देश आयुक्त अभिजीत बांगर यांनी सर्व कार्यकारी अभियंता आणि झोन सहायक आयुक्तांना दिले. यासंदर्भात प्रत्येक सोमवारी आढावा घेण्यात येईल. २३ मे पर्यंत ही कामे पूर्ण करण्याचे निर्देशही आयुक्तांनी यावेळी दिले. बैठकीला अतिरिक्त आयुक्त राम जोशी, अतिरिक्त आयुक्त अझीझ शेख, मुख्य अभियंता उल्हास देबडवार, ग्रीन व्हिजील फाऊंडेशनचे संस्थापक कौस्तभ चॅटर्जी, टीम लीडर सुरभी जयस्वाल, मेहुल कोसुरकर यांच्यासह विभागप्रमुख, सर्व झोनचे सहायक आयुक्त आणि कार्यकारी अभियंता उपस्थित होते.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.