सोयाबीन अनुदान योजनेमध्ये खासगी बाजार समित्यांचा समावेश
- सुभाष देशमुख
मुंबई, दि. 5 : राज्यात खरीप हंगाम 2016-17 मध्ये ऑक्टोबर ते डिसेंबर 2016 या कालावधीमध्ये खासगी बाजार व थेट पणन परवाना धारकांना सोयाबीन विक्री केलेल्या शेतकऱ्यांना प्रती क्विंटल 200 रुपये आणि जास्तीत जास्त 25 क्विंटल प्रती शेतकरी याप्रमाणे अनुदान देण्यात येईल. या योजनेचा लाभ 16 थेट पणन परवाना धारक आणि 11 खासगी बाजार परवाना धारकांना सोयाबीन विक्री केलेल्या शेतकऱ्यांना लाभ होणार आहे, अशी माहिती सहकार व पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी दिली.
मंत्रालयात सोयाबीन अनुदान योजनेमध्ये खासगी बाजार समित्यांचा समावेश करण्याबाबत मंत्रिमंडळाच्या उपसमितीची बैठक झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
श्री. देशमुख म्हणाले, राज्यात खरीत हंगाम 2016-17 मध्ये सोयाबीनच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने सोयाबीनची बाजारातील आवक वाढवून सोयाबीनच्या दरात घसरण झाली होती. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याच्या दृष्टीने प्रथमच राज्यतील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ऑक्टोबर ते डिसेंबर 2016 या कालावधीमध्ये सोयाबीन विक्री केली आहे अशा शेतकऱ्यांना प्रती क्विंटल 200 रुपये आणि जास्तीत जास्त 25 क्विंटल प्रती शेतकरी या प्रमाणे अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यामध्ये फक्त कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात सोयाबीन विक्री केलेल्या शेतकऱ्यांना अनुदान देण्यात आले होते. त्यानंतर शासन मान्य खासगी बाजार व थेट पणन परवानाधारक व्यक्ती/संस्था यांचे कामकाज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कामकाजाप्रमाणेचे सुरु असल्याने त्यांना सोयाबीन विक्री केलेल्या शेतकऱ्यांना लाभ मिळावा, अशी शेतकऱ्यांची मागणी होती. त्यानुसार खासगी बाजार व थेट पणन परवाना धारकांना सोयाबीन विक्री केलेल्या शेतकऱ्यांना अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या अनुदानासाठी शासन निर्णय 10 जानेवारी 2017 नुसार अटी व शर्ती निश्चित करण्यात येणार आहेत. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला अनुदान देण्यासाठी ज्या प्रमाणे नियम लागू केले होते त्याच नियमांचे पालन करण्यात येईल, असेही श्री. देशमुख यांनी सांगितले.
यावेळी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.