महापे येथे जागतिक दर्जाच्या इंडिया ज्वेलरी पार्कचे भूमिपूजन
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
कारागिरांना नवी मुंबईत प्रधानमंत्री आवासमधील घरे
मुंबई, दि. ५ : वर्ष २०२५ पर्यंत महाराष्ट्राची ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्था करण्याचे उद्दिष्ट्य आम्ही ठेवले असून जेम एंड ज्वेलरी क्षेत्राचे यात फार मोठे योगदान असणार आहे असे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई येथे जेम एंड ज्वेलरी विद्यापीठ स्थापन करण्याची घोषणा केली. नवी मुंबईच्या महापे येथे इंडिया ज्वेलरी पार्कच्या भूमिपूजनप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी केंद्रीय वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू यांनी देखील या पार्कसाठी तातडीने जागा उपलब्ध करून देण्याची कार्यवाही केल्याबद्धल मुख्यमंत्री तसेच उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचे आभार मानले.
मुख्यमंत्री आपल्या भाषणात म्हणाले की, गेल्या वर्षी जेम एंड ज्वेलरी एक्स्पोर्ट प्रमोशन कौन्सिलच्या परिषदेच्या समारोहात मी आलो असतांना या पार्क संदर्भात चर्चा झाली होती आणि अतिशय कमी कालावधीत सर्व प्रक्रिया पूर्ण करून आज या प्रकल्पाचे भूमिपूजन होत आहे ही समाधानाची बाब आहे. जगात भारत या क्षेत्रात निर्यातीत आघाडीवर असल्याने हा पार्क देखील एक वैशिष्ट्यपूर्ण पार्क म्हणून संपूर्ण जगात नावारूपाला यावा अशी इच्छा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.
कारागिरांना घरे देणार
या व्यवसायात सुरक्षेलाही तितकेच महत्व आहे जि की या प्रस्तावित पार्कमध्ये मिळेल असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की सुमारे १ लाख लोक यात काम करणार आहेत, त्यात अनेक कारागीर देखील असतील. त्या सर्वाना पार्कच्या जवळपासच्या भागात प्रधानमंत्री आवास योजनेतील घरे उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाईल. जेम एन ज्वेलरी क्षेत्रातील व्यापार १०० बिलियन डॉलर्सच्या वर नेण्याची आपली क्षमता आहे, महाराष्ट्राला ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्था बनविण्यात याचे मोठे योगदान होईल असेही ते म्हणाले.
स्वतंत्र विद्यापीठ स्थापणार
या क्षेत्रात कौशल्य आवश्यक आहे, अनेक व्यक्ती, तरुण यात काम करतात. यासाठी जेम एंड ज्वेलरी विद्यापीठ मुंबई तसेच परिसरात स्थापन करण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. खासगी विद्यापीठ कायद्यासंदर्भातील निकषांप्रमाणे तिची केंद्रे सुरु करता येतील असेही ते म्हणाले.
एक खिडकी व्यवस्था
या ज्वेलरी पार्कमध्ये एक खिडकी व्यवस्था करण्यात येईल त्यामुळे सर्व प्रकारच्या परवानग्या या याठिकाणीच मिळतील. त्यासाठी कुठेही एमआयडीसी किंवा इतर कुठेही प्राधिकरणात जाण्याची गरज नाही असेही मुख्यमंत्र्यांनी टाळ्यांच्या गजरात सांगितले.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शन आणि नेतृत्वाखाली देशात स्पीड आणि स्केल अशा दोन्ही बाबींचा विचार करून विकास सुरु आहे त्यामुळे एक नवीन भारत उदयास येतो आहे असेही ते म्हणाले.
प्रभूंकडून मुख्यमंत्र्यांचे कौतुक
केंद्रीय वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू म्हणाले की एकेकाळी आपल्या देशात सोनेकी चिडीया बसेरा करती थी असे म्हटले जायचे. आपल्याला आज ते प्रत्यक्षात साकार करावयाचे आहे. रशिया व इतर देशांतून कच्च्या स्वरूपातील र्हिरे-रत्ने आणून त्यावर मोठ्या प्रमाणावर प्रक्रिया करून ती निर्यात करण्याबाबत आमचे नियोजन आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कामाचे कौतुक करतांना सुरेश प्रभू म्हणाले की एकदाही साधे मंत्रीपद न भूषविलेले देवेंद्र फडणवीस आज थेट मुख्यमंत्री म्हणून जो कारभार करीत आहे त्याचे उदाहरण मी अनेक ठिकाणी देत असतो.
यावेळी बोलतांना उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी हा पार्क उभारण्यात उद्योग विभाग सर्वतोपरी सहकार्य करेल असे सांगून उद्योग विभागातील अधिकारी व कर्मचारी यांचे अभिनंदन केले.
याप्रसंगी जेम एंड ज्वेलरी एक्स्पोर्ट प्रमोशन कौन्सिलचे अध्यक्ष प्रमोद अग्रवाल यांनी मनोगतात या क्षेत्राला अधिक लाभ देण्याबाबत काही सुचना केल्या. पार्क मध्ये सामायिक सुविधा केंद्राला २५० कोटी द्यावे तसेच सीमा शुल्क कमी करण्याबाबत विनंती केली.
काय आहे ज्वेलरी पार्क ?
फेब्रुवारी २०१८ मध्ये मॅग्नेटिक महाराष्ट्र परिषदेत जेम एंड ज्वेलरी एक्स्पोर्ट प्रमोशन कौन्सिल यांच्याशी महाराष्ट्र शासनाने एक सामंजस्य करार केला होता. त्यानुसार आज ज्याप्रमाणे झवेरी बाजार येथे सोने-चांदी- हिरे यांचा व्यापार चालतो तसा महापे येथे एका छताखाली तो इंडिया ज्वेलरी पार्कच्या माध्यमातून चालविला जाणार आहे. १४ हजार ४६७ कोटी रुपयांची गुंतवणूक येणार आहे. यामुळे ४१ हजार ४६७ कोटींची उलाढाल होईल. चीनमधील शेनझेन मॉडेल प्रमाणे हे पार्क विकसित केले जाणार असून यामुळे विखुरलेला हा व्यापार एका ठिकाणी येईल व निर्यातीला अधिक चांगले प्रोत्साहन मिळेल. याठिकाणी ४ हजार ५०० उद्योग –व्यवसाय सुरु होतील तसेच १ लाखापेक्षा जास्त लोकांना रोजगार मिळेल. सध्या रत्न आणि दागिने व्यापाराचा देशातील एकूण निर्यातीत १५ टक्के वाटा असून हे क्षेत्र पूर्णत: कारागीर आणि कामगारांवर आधारित आहे.
महापे येथे प्लॉट क्रमांक ओएस -१२, एमआयडीसी –टीटीसी , इलेक्ट्रोनिक झोन, महापे येथे हा पार्क उभारण्यात येणार आहे. या भूमिपूजन कार्यक्रमास आमदार राज पुरोहित, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ अनबलगन, वाणिज्य मंत्रालयाच्या आर्थिक सल्लागार रूपा दत्ता,जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर आदींची उपस्थिती होती.
००००