- सुधीर मुनगंटीवार
मुंबई दि. ५ : महाराष्ट्र नेचर पार्क माहिम येथे कांदळवन संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र उभारण्यासाठी १.५ एकर जागा कांदळवन कक्षास त्वरीत हस्तांतरीत केली जावी, असे निर्देश वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज एम.एम.आर.डी.ए ला दिले.
यासंबंधी मंत्रालयात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी वन विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे आणि इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी श्री. मुनगंटीवार यांनी एम.एम.आर.डी.ए चे आयुक्त आर. ए. राजीव यांच्याशीही दूरध्वनीहून चर्चा केली.
कांदळवन संरक्षण आणि संर्वधनासाठी २०१२ मध्ये वन विभागांतर्गत स्वतंत्र कांदळवन कक्षाची निर्मिती करण्यात आली. या कक्षामार्फत कांदळवन संरक्षण आणि संवर्धनाची कामे सातत्याने केली जात असून यासंबधीची जनजागृती ही करण्यात येत आहे. यामुळेच २०१५ ते २०१७ च्या कालावधीत राज्यात कांदळवनाचे क्षेत्र ८२ चौ.कि.मी ने वाढले असल्याचे सांगून श्री. मुनगंटीवार म्हणाले, राज्य कांदळवन संरक्षण आणि संवर्धनात या कालावधीत देशात प्रथम क्रमांकावर आले आहे. याकामी आणखी जनजागृती करण्यासाठी, यासंबंधीचे संशोधन, प्रशिक्षण देण्यासाठी कांदळवन संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राची आवश्यकता आहे. यामध्ये कांदळवनाच्या विविध प्रजातींच्या रोपवाटिका, आर्बेटरियम, सर्वसमावेशक कांदळवन माहिती केंद्र, ग्रंथालय, प्रशिक्षण व त्यासाठीची निवास व्यवस्था, यासारखी कामे प्रस्तावित आहेत. त्यासाठी माहिम नेचर पार्क येथील १.५ एकर जागा देण्याबाबत वन विभागाने एम.एम.आर.डी.ए कडे प्रस्ताव पाठवला होता. त्यास एम.एम. आर.डी.एच्या ठरावान्वये मान्यता ही देण्यात आली आहे. त्यानुसार हे १.५ एकरचे क्षेत्र कांदळवन कक्षाकडे लवकरात लवकर हस्तांतरित केले जावे, अशा सूचना वनमंत्र्यांनी आज दिल्या.