जिल्हा कार्यकारिणीच्या सभेत ठराव पारित
नागपूर / अरूण कराळे:
जिल्हा परिषद प्रशासनाकडून शिक्षकांच्या प्रश्नांवर घेण्यात येत असलेल्या वेळकाढू भूमिकेचा विरोध करण्यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती जिल्हा नागपूरच्या वतीने तीव्र आंदोलन उभारण्याचा निर्णय संघटनेच्या जिल्हा कार्यकारिणीच्या सभेत घेण्यात आला असल्याचे जिल्हाध्यक्ष लीलाधर ठाकरे व सरचिटणीस अनिल नासरे यांनी संयुक्त प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केले आहे.
जि.प.स्तरावर शिक्षकांचे अनेक प्रश्न ब-याच दिवसापासून मोठ्या प्रमाणात प्रलंबित आहेत. यामध्ये विषय पदवीधर शिक्षकांना पदवीधर वेतनश्रेणी लागू करणे, आदिवासी क्षेत्रातील शिक्षकांना एकस्तर वेतनश्रेणी लागू करणे. भविष्य निर्वाह निधी कपातीमधील अनियमितता दूर करणे. आयकर कपाती (टीडीएस) संबंधीत प्रकरणे निकाली काढणे.वरिष्ठ वेतनश्रेणीचे प्रस्ताव मंजूर करणे.निवडश्रेणी लागू करणे. चार महीण्याची घरभाडे भत्त्याची थकबाकी अदा करणे शाळांचे प्रलंबित व चालू विजबील जि.प.अथवा ग्रामपंचायत मार्फत भरणे, केंद्रप्रमुख व विस्तार अधिकारी यांची रिक्त पदे त्वरीत भरणे,यासह अनेक प्रश्न जि.प स्तरावर अनेक दिवसापासून प्रलंबित आहेत.
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती च्या वतीने याबाबत सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे.परंतू जि.प.प्रशासनाची मात्र या प्रश्नांबाबत उदासिन भूमिका असल्याचे दिसून येते. शिक्षकांच्या या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर शिक्षण विभागाकडून दिरंगाई व वेळकाढूपणाचे धोरण अवलंबिण्यात आल्याचे निदर्शनास येते.
त्यामुळे शिक्षकांच्या या जिव्हाळ्याचे प्रश्न निकाली काढण्यासाठी तीव्र आंदोलन उभारण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष लीलाधर ठाकरे यांचे अध्यक्षतेखाली अध्यापक भवन नागपूर येथे नुकत्याच झालेल्या सभेत घेण्यात आला.
सभेला सुरेश पाबळे ,अनिल नासरे ,सुरेश श्रीखंडे, मिनल देवरणकर ,निळकंठ लोहकरे, प्रकाश, सव्वालाखे ,हेमंत तितरमारे ,कमलाकर काळे, पुष्पा पानसरे ,स्नेहा बांगडे ,निता बोकडे ,कुंती भालेराव ,हर्षाली दळवी, शैला भिंगारे, कल्पना इंगळे, मिनाक्षी कदम, सुनिता कठाणे ,सविता राऊळकर, प्रतिभा कन्हीरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.