नवरगाव/प्रतिनिधी:
विदर्भाची नाट्य पंढरी म्हणून ओळख असलेल्या नवरगावच्या श्री व्यंकटेश नाट्य मंडळाचे तीन व्यावसायिक नाटक आता पुण्या- मुंबईत सादर होत आहेत.
झाडीपट्टी रंगभूमीवर सुपरहिट ठरलेले सदानंद बोरकर यांचे 'अस्सा नवरा नको गं बाई' हे नाटक यावर्षी नागपूर येथे झालेल्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनात सादर झाले. कविवर्य सुरेश भट सभागृहात मध्यरात्री २ वाजता नाटक होऊनही ते हाऊसफुल होते. पुण्या- मुंबईच्या दिगग्ज कलावंतांनी पहाटे पाचपर्यंत आस्वाद घेतला. प्रेक्षकांनी अक्षरश: नाटक डोक्यावर घेतले. सर्वदूर चर्चा गेली आणि आयोजकांनी त्याचे प्रयोग पुण्या-मुंबईच्या प्रेक्षकांसाठी लावले. त्यानुसार ६ मार्च रोजी दुपारी ४ वाजता साहित्य संघ गिरगाव येथे महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या ३१ व्या व्यावसायिक नाट्य स्पर्धेत 'गंगाजमुना' या नाटकाचा प्रयोग सादर होणार असून, ७ मार्चला दुपारी ४ वाजता बोरिवलीच्या प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात 'अस्सा नवरा नको गं बाई' हे नाटक सादर होणार आहे.
महिलादिनाचे औचित्य साधून ८ मार्चला रात्री ९ वाजता पुण्याच्या बालगंधर्व नाट्यमंदिरात 'अस्सा नवरा नको गं बाई' या नाटकाचा प्रयोग सादर करण्यात येणार आहे. दोन्ही नाटकाचे लेखक आणि दिग्दर्शक सदानंद बोरकर असून यानिमित्त पुणे -मुंबईकरांना झाडीपट्टीचे बघायला मिळणार आहे. .