Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, मार्च ०४, २०१९

गोवर-रुबेला लसीकरण मोहिमेत चंद्रपूर मनपा राज्यात अव्वल स्थानावर

चंद्रपूर/प्रतिनिधी:

गोवर व रुबेला या आजारापासून संरक्षण मिळविण्यासाठी, सुदृढ व सक्षम पिढी घडविण्यासाठी केंद्र व राज्य शासनातर्फे गोवर-रुबेला लसीकरण मोहीम देशपातळीवर राबविण्यात आली. या मोहिमेत संयुक्त प्रयत्नांनी चंद्रपूर महानगरपालिका संपूर्ण महाराष्ट्रात अव्वल स्थानावर आली आहे.

गोवर-रुबेला मोहिमेत शाळेतील १०० टक्के लाभार्थी विद्यार्थ्यांचे लसीकरण केलेले मुख्याध्यापक, सक्रिय सहभागी झालेल्या स्वयंसेवी संस्था व उत्कृष्ट कार्य केलेल्या कर्मचाऱ्यांचा नुकताच सत्कार करण्यात आला. यावेळी महापौर अंजली घोटेकर, उपमहापौर अनिल फुलझेले, स्थायी समिती सभापती राहुल पावडे, आयुक्त संजय काकडे, महिला व बालकल्याण सभापती जयश्री जुमडे, महिला व बालकल्याण उपसभापती शीतल गुरनुले, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अंजली आंबटकर, आयएमए अध्यक्ष डॉ. प्रमोद राऊत, मनपा शिक्षण अधिकारी नागेश नीत, मनपा नागरी आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. जयश्री वाडे, डॉ. आकुलवार, डॉ. विजया खेरा , डॉ. नयना उत्तरवार व आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

मनपाच्या आरोग्य विभाग प्रमुख तथा वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अंजली आंबटकर यांनी प्रस्ताविकेत सांगितले की, चंद्रपूर मनपातर्फे राष्ट्रीय गोवर-रुबेला लसीकरण मोहीम २७ नोव्हेंबर २०१८ ते १५ फेब्रुवारी २०१९ दरम्यान राबविण्यात आली होती. ९ महिने ते १५ वर्षे वयोगटातील चंद्रपूर शहरातील एकूण ८३८७० लाभार्थ्यांपैकी एकूण ८३०४२ (९९ टक्के) लाभार्थ्यांचे मनपाने यशस्वीरीत्या लसीकरण केले. शहरातील १९९ शाळांपैकी १८४ शाळांमध्ये १०० टक्के लाभार्थ्यांचे लसीकरण केले गेले. ज्यात त्या शाळांच्या मुख्याध्यापकांचे मोलाचे सहकार्य लाभले. जिल्हा परिषदेचे विस्तार अधिकारी (शिक्षण) श्री गणेश चव्हाण तसेच मनपा शिक्षण अधिकारी नागेश नित यांनी कोर ग्रुप सदस्य म्हणून महत्वाची भूमिका निभावून मोहिमेच्या यशस्वितेकरिता योगदान दिले. चंद्रपूर आयएमए अध्यक्ष डॉ. प्रमोद राऊत, आयएपी अध्यक्ष डॉ. एम. जे. खान व लायन्स क्लब अध्यक्ष शैलेश बांगला यांनी व त्यांच्या संस्थेतील सर्व सदस्यांनी सक्रिय सहभाग घेऊन मनपाला या मोहीमेची यशस्वी अमलबजावणी करण्यास मोलाचे सहकार्य केले.

याप्रसंगी उपस्थित असलेले शाळांचे मुख्याध्यापक, आयएमए अध्यक्ष डॉ. प्रमोद राऊत, शहरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. जयश्री वाडे, डॉ. अलका अकुलवार, डॉ. विजया खेरा, डॉ. नयना उत्तरवार यांचा व आरोग्य विभाग कर्मचाऱ्यांचा तसेच ही मोहीम पूर्णपणे यशस्वी केल्याबद्दल वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अंजली आंबटकर यांचा सत्कार करण्यात आला. आयुक्त संजय काकडे यांनी शाळांचे मुख्याध्यापक, आशा वर्कर यांचे विशेष आभार मानले

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.