नागपूर ७ जुलै २०२३ : सुप्रसिद्ध लेखक जी.ए.कुळकर्णी यांच्या जन्मशताब्दी सांगता समारोहाच्या निमित्ताने त्यांच्या काजळमाया या संग्रहातील "भोवरा" या विलक्षण कथेवर सेवानिवृत्त निवासी जिल्हाधिकारी आणि ज्येष्ठ रंगकर्मी प्रमोद भुसारी लिखित "भोवरा" या दोन अंकी नाटकाच्या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. विदर्भ साहित्य संघ, विदर्भ गौरव प्रतिष्ठान आणि विजय प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा प्रकाशन समारंभ रविवार ९ जुलै रोजी सकाळी ११ वाजता "अमेय दालन", विदर्भ साहित्य संघ सांस्कृतिक संकुल,चवथा मजला, झाशी राणी चौक, सीताबर्डी नागपूर येथे आयोजित करण्यात येत आहे. Pramod Bhusari
या पुस्तकाचे प्रकाशन सुप्रसिद्ध साहित्यिक महेश एलकुंचवार यांचे शुभहस्ते करण्यात येणार असून प्रमुख अतिथी म्हणून गिरीश गांधी तर अध्यक्षस्थान प्रदीप दाते भूषविणार आहेत. या प्रसंगी वसंत आबाजी डहाके आणि डॉ. रवींद्र शोभणे यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. एकूणच, प्रतिभावंत साहित्यिकांच्या भाष्याची या निमित्ताने उपस्थितांना पर्वणी लाभणार आहे.
सुप्रसिद्ध चित्रकार नाना मिसाळ हे या नाटकावरील होणाऱ्या भाष्यावर उत्फूर्त चित्र रेखाटणार असल्याने हे या कार्यक्रमाचे वेगळेपण आणि विशेष आकर्षण ठरणार आहे.
तरी याप्रसंगी कला,साहित्य, नाट्य रसिक आणि वाचकप्रेमी मंडळींनी आवर्जून उपस्थित राहावे असे आयोजकांच्यावतीने आवाहन करण्यात आले आहे.