जिल्हा बाल संरक्षण कक्षाने रोखला बालविवाह
चंद्रपूर, दि.7 मार्च- सावली तालुक्यातील सिंगापुर येथे होणारा बालविवाह जिल्हा बाल संरक्षण कक्ष व इतर शासकीय विभागाच्या समन्वयाने दिनांक 9 मार्च रोजी होणारा बालविवाह दि. 6 मार्च 2019 रोजी थांबविण्यात आला. अल्पवयीन मुलीचा बालविवाह होणार असल्याची माहिती जिल्हा बाल संरक्षण अधिकारी चंद्रपूर यांना निनावी फोन व्दारे मिळाली. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमणार व जिल्हा पोलिस अधिक्षक, डॉ.महेश्वर रेड्डी यांचे नेतृत्वात आणि जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी अपर्णा कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर गावात अल्पवयीन बालिकेच्या घरी भेट देऊन बाल विवाह थांबविण्यासाठी कार्यवाही करण्यात आली.
सावली तालुक्यात होत असलेल्या बालविवाह प्रकरणाबाबत त्याच कार्यक्षेत्रातील यंत्रणा पोलिस स्टेशन, बाल विकास प्रकल्प अधिकारी (ग्रामिण), तहसिल कार्यालय, गट विकास अधिकारी, पंचायत समिती तसेच शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर यांना सुद्धा घटनेची माहिती देण्यात आली. या सर्व शासकिय यंत्रणेच्या सहकार्याने बाल विवाह थांबविण्यात आला. बालिकेला व तिच्या आईला तसेच इतर नातेवाईकांना समुपदेशिकेमार्फत समुपदेशन करण्यात आले. तसेच बाल विवाह प्रतिबंध अधिनियम 2006 नुसार बालविवाह करणे कायद्याने गुन्हा असून त्यावर असणारे शिक्षा व दंड याची माहिती दिली. मार्गदर्शनानंतर बालिका व आई आणि नातेवाईक यांनी विवाह थांबविण्याबाबत संमती दिली. बालिकेला 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतरच लग्न करु असे आश्वासन दिल्यानंतर बाल कल्याण समिती, चंद्रपूर समोर हजर होण्यास सांगितले.
सदर घटनास्थळी जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अजय साखरकर, पोलिस निरीक्षक, धुळे, पोलीस उपनिरीक्षक टेकाम व चमु पोलिस स्टेशन सावली, समुपदेशीका प्रिया पिंपळशेंडे, सामाजिक कार्यकर्ती प्रतीभा मडावी, माहिती विश्लेषक अभिनित तितरे, गट शिक्षणाधिकारी श्री. खांडरे, शिक्षणाधिकारी (प्राथ.) दिपेद्र लोखंडे, गट विकास अधिकारी अमोल भोसले, तसेच जिल्हा बाल संरक्षण कक्षातील सर्व कर्मचा-यांनी सदर बालविवाह थांबविण्यास सहकार्य केले.
बालविवाह होत असल्याची माहिती कोणत्याही नागरीकांनी ग्राम बाल संरक्षण समिती, तालुका बाल संरक्षण समिती, नगर बाल संरक्षण समिती व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी कार्यालय चंद्रपूर दूरध्वनी क्र. 07172-255667 वर संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, चंद्रपूर यांनी केले.