Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, मार्च ०७, २०१९

आमच्या मुलांपुढेही सुनांचे कार्य अधिक स्पृहणीय:डॉ.आमटे

मंदाकिनी आमटेच्या रूपाने “सामाजिक ऊर्जा” मिळाली :डॉ. प्रकाश आमटे

सामाजिक कार्यासाठी निमित्त,संधी व संकल्प गरजेचा:डॉ.प्रकाश आमटे

नागपूर/प्रतिनिधी:

निर्मिती हा स्त्रीचा स्थायी भाव आहे,निर्मिती हीच शक्ती/ऊर्जा आहे. सामाजिक कार्यात ऊर्जा निर्माण करण्यासाठी निमित्त, संधी व संकल्प आवश्यक आहे. स्वत:शी प्रामाणिक राहिल्यास त्याचा निश्चितच परिणाम दिसून येतो. बाबा आमटे आणि साधना आमटे यांच्या संस्काराला मानवतेची ऊर्जा होती,वेगळ्यावाटेवर प्रवास करताना डॉ.मंदाकिनी आमटे यांच्या रूपाने मला लोकबिरादरी प्रकल्पासाठी “ऊर्जा” लाभली असल्याचे डॉ. प्रकाश आमटे यांनी सांगितले. ते महानिर्मितीच्यावतीने गतिमान प्रशासन मानव संसाधन या संकल्पनेतून महिला दिनानिमित्त “संवाद सामाजिक उर्जेचा” या मुलाखतपर कार्यक्रमात प्रकाशगड मुख्यालय मुंबई येथील सभागृहात बोलत होते.  

विवाहासाठी सुंदरता व भौतिक गोष्टींपेक्षा विचारांची एकरूपता,आदरभाव,स्वातंत्र्य व गुण फुलविण्यास सहकार्य आवश्यक:डॉ. मंदाकिनी आमटे

मुलभूत सुविधांपासून कोसो मैल दूर असलेल्या माडिया आदिवासींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आमचा प्रयत्न होता. डॉ.मंदाकिनी आमटे यांनी शब्द पाळला आणि अभावात आनंद मानून अनोळखी लोकांचे कुटुंब निर्माण केले आणि आम्ही बरोबरीने काम केले.  साधना आमटे(सासूने) डॉ.मंदाकिनी आमटे(सुनेला) उर्जेचा स्त्रोत म्हटले असल्याचे त्यांनी उपस्थितांना सांगितले.  

विवाह करताना, सुंदरतेपेक्षा,भौतिक गोष्टींपेक्षा विचारांची एकरूपता, एकमेकांप्रती आदरभाव, स्वातंत्र्य व गुण फुलविण्यासाठी सहकार्य इत्यादी गोष्टींना महत्वाच्या असल्याचे डॉ.मंदाकिनी आमटे यांनी सांगितले. अपार कष्ट, निस्वार्थ कार्यातूनच चिरकाळ टिकणारे मोती घडत असतात.

आज आमटे परिवाराची तिसऱ्या पिढीत दोन मुले (अनिकेत व दिगंत) डॉक्टर असून सुना गोवा व पुण्यातील आहेत. सुनांनी देखील शहरातील भौतिक सुखाचा त्याग करून सामाजिक कार्याचे व्रत स्वीकारले असून आज त्यांचे शैक्षणिक कार्य दर्जेदार व स्पृहणीय आहे. नातवंडे देखील हेमलकसा परिसरात रमले असल्याचे त्यांनी सांगितले. 

रेणुका देशकर यांनी मानवी आंतरिक ऊर्जा व आमटे परिवाराने जगाला दाखविलेली सामाजिक ऊर्जा यांचा धागा पकडून अतिशय मार्मिक प्रश्न विचारत आमटे दाम्पत्याच्या जीवनातील कडू-गोड अनुभवाची अतिशय खुबीने उकल करून उपस्थितांची वाहवा मिळविली. 

प्रारंभी प्रास्ताविकातून कार्यकारी संचालक विनोद बोंदरे यांनी सांगितले कि प्रत्येक दिवशी महिलांचा आदर-सन्मान व्हावा हीच खरी महिला दिन आयोजनामागची भूमिका आहे तर अध्यक्षीय भाषणातून संतोष आंबेरकर म्हणाले कि महानिर्मितीच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आम्ही कटिबद्ध असून त्याकरिता सातत्याने प्रयत्न करण्यात येत असल्याचा सार्थ अभिमान त्यांनी व्यक्त केला. आनंदवन व लोक बिरादरी प्रकल्प हेमलकसा यावर प्रकाश टाकणारी प्रेरणादायी चित्रफित दाखविण्यात आली तर दीप प्रज्वलानावेळी “तू बुद्धी दे, तू तेज दे” या प्रार्थनेने वातावरणात ऊर्जा निर्माण केली. स्वागतपर कार्यक्रमाचे सूत्र संचालन सोनाली चुंगडे यांनी केले. 

ह्या कार्यक्रमाला महावितरणचे संचालक सतीश चव्हाण, दिनेशचंद्र साबू, भालचंद्र खंडाईत, कार्यकारी संचालक चंद्रशेखर येरमे, महानिर्मितीचे कार्यकारी संचालक कैलाश चिरूटकर, मुख्य अभियंते धैर्यधर खोब्रागडे, माधव कोठुळे, डॉ.नितीन वाघ तसेच अनिल मुसळे,दत्तात्रय पाटील, महानिर्मिती,महावितरण आणि महापारेषणचे अधिकारी,कर्मचारी तसेच महिला कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.