- 200 नविन बससेचा ताफा लवकरच चंद्रपूर जिल्हयात दाखल होणार
- महिलांना आर्थिकदृष्टया सक्षम करण्यासाठी
- रोजगार निर्मिती केंद्र बल्लारपुरात उभारणार
चंद्रपूर, दि.7 मार्च : चंद्रपूर जिल्ह्यातील सर्वात आधुनिक अशा बल्लारपूर बसस्थानकाचे लोकार्पण काल बुधवारी एका शानदार सोहळ्यात राज्याचे वित्त, नियोजन वने मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांच्याहस्ते करण्यात आले. एखाद्या विमानतळाला साजेशा या बसस्थानकाला बघायला एकच गर्दी उडाली असून महाराष्ट्रातील सर्वात सुंदर असे तालुक्याचे बसस्थानक म्हणून बल्लारपूरचे नावलौकिक होत आहे.
दि.6 मार्च रोजी बल्लारपूर शहरात 11 कोटी रू. निधी खर्चुन बांधण्यात आलेल्या अत्याधुनिक बसस्थानकाचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. यावेळी आयोजित कार्यक्रमात ना.सुधीर मुनगंटीवार बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले, बल्लारपूर येथील देखणे बसस्थानक जनतेच्या सेवेत रुजू झाले आता 200 नविन बससेचा ताफा लवकरच चंद्रपूर जिल्हयात दाखल होईल.
कार्यक्रमाच्या मंचावर वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, बल्लारपुरचे नगराध्यक्ष हरीश शर्मा, माजी आमदार जैनुद्दीन जव्हेरी, न.प. उपाध्यक्षा सौ. मिना चौधरी,जिल्हा परिषदेचे सभापती ब्रिजभुषण पाझारे, संतोष तंगडपल्लीवार, जिल्हा परिषद सदस्य संजय गजपुरे, काशिनाथ सिंह, किशोर पंदिलवार, चंद्रपूर मनपाचे स्थायी समिती सभापती राहुल पावडे, राज्य परिवहन महामंडळाचे विभाग नियंत्रक राजेंद्रकुमार पाटील, विभागीय अभियंता राहुल मोडक, कार्यकारी अभियंता नरेंद्र खांडेकर, वास्तु विशारद रवी सोनकुसरे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
यावेळी बोलतांना ना.सुधीर मुनगंटीवार यांनी या देखण्या बसस्थानकाच्या बांधकाम प्रक्रियेत योगदान देणा-या अधिकारी कर्मचा-यांचे आभार व्यक्त केले. ते पुढे म्हणाले,बसस्थानकाप्रमाणेच शहरात 12 कोटी 50 लाख रुपये किंमतीचे भाजी मार्केटसुध्दा अत्याधुनिक पध्दतीने बांधण्यात येणार आहे. या बसस्थानकात आयटीसी कंपनीच्या सहकार्याने 11 लाख रू. खर्चुन प्रवाश्यांना शुध्द पाण्यासाठी आरो मशिन बसविण्यात आली आहे. मिशन अटल दिव्यांग स्वावलंबन योजनेचा शुभारंभ आज आपण केला. 40 टक्यापेक्षा जास्त अपंगत्वाचे प्रमाण असलेल्या दिव्यांग बांधवांना 45 हजार रू. किंमतीची बॅटरीवर चालणारी सायकल आपण दिली. जिल्हयात 1 हजार पेक्षा जास्त दिव्यांग बांधवांना याचा लाभ मिळणार आहे , असेही ते म्हणाले.
दोन महिन्यानंतर जिल्हयात 200 नविन बसेसचा ताफा धावणार असुन या माध्यमातुन प्रवाश्यांना उत्तम सुविधा पुरविण्याचा संकल्प त्यांनी जाहीर केला. ते पुढे म्हणाले, विरोधी पक्षात असतांना सास्ती ब्रिजचे बांधकाम संघर्षपुर्वक पुर्ण केले. बल्लारपुर या एका तहसिलीचा समावेश असलेले उपविभागीय कार्यालय आपण मंजुर केले व जनतेच्या सेवेत रूजु केले. स्मार्ट पोलिस स्टेशन, अनेक बगीचे, 65 कोटी रू. किंमतीची 24X7 पाणी पुरवठा योजना, देशातील सर्वाधिक सुंदर रेल्वे स्टेशन, छटपुजा घाट, गणपती विसर्जन घाट, ऑटो रिक्षा स्टँड, वस्ती परिसरातील रस्ता, ग्रामीण रूग्णालय, श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालय, आयएमए सभागृह, डायमंड कटींग सेंटर, देखणे नाटयगृह अशी विविध विकास कामे आपण शहरात पुर्णत्वास आणली आहे. वे.को.लिच्या सहकार्याने शहरात लवकरच 18आरो मशिन उपलब्ध करण्यात येणार आहे. 1 जून 2019 रोजी बल्लारपुर नजीक देशातील 26 वी सैनिक शाळा लोकार्पीत होणार असुन पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या शुभहस्ते या सैनिकी शाळेचे लोकार्पण होणार आहे. सैन्य दलाचे प्रमुख लेफ्टनन्ट जनरल आर.आर. निंबोरकर यांनी सुध्दा या सैनिकी शाळेचे कौतुक करत ही देशातील सर्वोत्तम सैनिकी शाळा ठरेल असा विश्वास व्यक्त केला आहे. बल्लारपुर शहरानजीकचे बॉटनिकल गार्डन हे देशातील सर्वोत्तम बॉटनिकल गार्डन ठरणार असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. या बॉटनिकल गार्डन मधील सायन्स पार्क, अटल प्लॅनेटोरियम ही सौंदर्यस्थळे अनुसंधानाचे उत्तम केंद्र ठरणार आहे, असेही ते म्हणाले. 33 केव्ही विद्युत उपकेंद्राचे उद्घाटन आज झाले. त्यामाध्यमातुन नियमित विज पुरवठा नागरिकांना होणार असुन यापुढे विद्युत ट्रान्सफॉर्मर बिघाडाची समस्या उद्भवणार नाही.
मिशन शौर्यच्या माध्यमातुन जिल्हयातील आदिवासी विद्यार्थ्यांनी माऊंट एव्हरेस्ट हे शिखर सर करुन जिल्हयाची मान अभिमानाने उंच केली ही बाब गौरवास्पद असल्याचे सांगत ते पुढे म्हणाले, 2024 च्या ऑलिम्पीक स्पर्धेत या भागातील खेळाडु प्राविण्य प्राप्त ठरतील यासाठी मिशन शक्ती हे मिशन आपण हाती घेतले असुन बल्लारपुर शहरा नजीक अत्याधुनिक स्टेडियमचे बांधकाम सुरु आहे. त्यामाध्यमातुन मिशन शक्तीची मुहुर्तमेढ आपण रोवणार आहोत. ऑलिम्पीक स्पर्धेत जेव्हा या जिल्हयातील मुले पदके प्राप्त करतील त्या पदकांची झळाळी बल्लारपुर येथील स्टेडियमपर्यंत निश्चितपणे पोहचेल. या भागातील विधवा परित्यक्ता भगिनींना आर्थिक दृष्टया स्वावलंबि करण्यासाठी एक मोठे रोजगार निर्मिती केंद्र लवकरच आपण बल्लारपुरात उभारणार असल्याचे संकल्प त्यांनी यावेळी जाहीर केला.
हा मतदार संघ 100 टक्के एलपीजी गॅसयुक्त ठरावा, 100 टक्के आरोयुक्त ठरावा व त्या माध्यमातुन शुध्द पाणी जनतेला मिळावे व या मतदार संघातील अंगणवाडया आयएसओ मानांकित ठराव्या हे तीन संकल्प आपण केले असुन नागरिकांच्या प्रेमाच्या बळावर हे संकल्प पुर्ण करण्याचा निर्धार त्यावेळी व्यक्त केला. माझे मंत्री कार्यालय देशातील पहिले आयएसओ मानांकित मंत्री कार्यालय ठरले त्याच धर्तीवर बल्लारपुर मतदार संघ देशातील सर्वोत्तम मतदार संघ ठरेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी बोलतांना नगराध्यक्ष हरीश शर्मा यांनी बल्लारपुर शहराच्या सौंदर्यात भर घालणा-या बसस्थानकासह विविध विकास कामांचा झंझावात निर्माण केल्याबद्दल अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आभार व्यक्त केले. 1995 पासुन आजच्या क्षणापर्यंत विकासाचा अविरत प्रवास त्यांच्या नेतृत्वात सुरु आहे. बल्लारपुर शहराची ओळख अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यामुळे जागतिक पातळीवर झाली आहे. विकासकामे आणि लोककल्याणकारी उपक्रम यांची सांगड घालत कार्यरत हा लोकनेता या मतदार संघाचा लोकप्रतिनिधी आहे याचा आम्हाला अभिमान असल्याचे हरीश शर्मा यावेळी बोलतांना म्हणाले. यावेळी चंदनसिंह चंदेल, देवराव भोंगळे यांचीही भाषणे झालीत.
यावेळी 12 कोटी 50 लाख रू. किंमतीच्या शहरातील विविध विकास कामांचे ई भुमिपुजन करण्यात आले. त्याचप्रमाणे अटल दिव्यांग स्वावलंबन मिशन अंतर्गत दिव्यांग बांधवांना बॅटरी ऑपरेटेड सायकली वितरीत करण्यात आल्या. कार्यक्रमाचे संचालन नासिर खान यांनी केले. कार्यक्रमाला बल्लारपुर शहरातील नागरिकांची मोठया संख्येन उपस्थिती होती.
देखणे बसस्थानक
11 कोटी रु. खर्चुन बांधण्यात आलेले बल्लारपुरातील बसस्थानक एखाद्या विमानतळासारखे दिसत होते. प्रशस्त फलाट मोठे वाहन तळ, प्रसाधनगृहे, सर्व सोयींनी युक्त चौकशी कक्ष,पाण्याची सुविधा, आकर्षक आसन व्यवस्था आदींमुळे या बसस्थानकाला पंचतारांकित लुक प्राप्त झाला आहे. राज्यात कुठेही इतके आकर्षक बसस्थानक बघितले नसल्याची प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करत होते व अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आभारही व्यक्त करत होते. या बसस्थानकात दोन मोठया झाडांचा वापर रंगसंगतीच्या माध्यमातुन करण्यात आला असुन हे प्रवाश्यांसाठी सेल्फी पॉईंट ठरले आहेत. 00000