चिंतन एका मनस्विनीचे पुस्तक प्रकाशन समारंभ 17 रोजी
नागपूर/ प्रतिनिधी
डॉ . जया द्वादशीवार यांच्या ललित लेखांचा संग्रह असलेल्या ' चिंतन एका मनस्विनीचे ' या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ रविवार १७ मार्च २०१९ रोजी सायंकाळी ५.३० वाजता चंद्रपूर येथे ज्येष्ठ पत्रकार व साहित्यिक सुरेश द्वादशीवार यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती ज्येष्ठ पत्रकार देवेंद्र गावंङे आणि वनराईचे गिरिश गांधी यांनी दिली.
डॉ . जया द्वादशीवार यांचे दोन वर्षांपूर्वी निधन झाले . इंग्रजीच्या प्राध्यापक म्हणून दीर्घकाळ नोकरी केलेल्या जया द्वादशीवार यांनी मराठी व इंग्रजीत विपुल लेखन केले. त्यांच्या इंग्रजी लेखनावरील पुस्तकाचे प्रकाशन गेल्यावर्षी झाले. यावेळी मराठी लेखनावरील पुस्तक प्रकाशित होणार आहे. त्यांनी लिहिलेले हे लेख विविध ठिकाणी प्रकाशित झाले आहेत. याच क्रमातील ‘ चिंतन एका मनस्विनीचे ' या पुस्तकाचे प्रकाशन भारताचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते होईल. यावेळी डॉ. श्रीकांत तिडके व डॉ प्रमोद मुनघाटे हे ' चिंतन एका मनस्विनीचे ' या पुस्तकावर भाष्य करतील.
या कार्यक्रमाला ज्येष्ठ समाजसेवक भारती व विकास आमटे , मंदा व प्रकाश आमटे , ' साधना ' चे संपादक विनोद सिरसाट व पुण्यातील प्रकाशक आनंद लाटकर उपस्थित राहतील . या कार्यक्रमात सेवाग्रामच्या नई तालीमच्या संचालक सुषमा शर्मा व आनंदवनचे ज्येष्ठ रुग्णसेवक डॉ . बाबा पोळ यांना प्रत्येकी एक लक्ष रुपये व सन्मानचिन्ह देवून त्यांचा सत्कार करण्यात येईल , सुषमा शर्मा या वर्धा येथे महात्मा गांधींच्या स्वप्नातील नई तालीम ही शाळा गेल्या अनेक वर्षापासून संचलित करतात . डॉ . बाबा पोळ यांनी गेली तीन दशके आनंदवनातील कुष्ठरुग्णांची सेवा केली आहे . त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणून त्यांना हा पुरस्कार देण्यात येत आहे.