नवी दिल्ली, 5 मार्च 2019
रत्नागिरी नागरी विमानतळ तयार करण्यासाठी संरक्षण मंत्रालय, महाराष्ट्र राज्य सरकार आणि भारतीय विमानतळ प्राधिकरण सारख्या सर्व भागधारकांशी बोलणी करून उडान योजनेच्या प्रादेशिक वाहतूक योजनेंतर्गत रत्नागिरी विमानतळास सक्रिय करण्यात येणार आहे. आरसीएस ऑपरेशन्स सुरू करण्यासाठी पॅसेंजर टर्मिनल, ऍप्रॉन आणि टॅक्सीवे तयार करणे तसेच विमान आणि प्रवाशांना हाताळण्यासाठी आधारभूत सुविधा प्रदान करण्यासाठी एम आय डी सी कार्यरत राहणार आहे.
या प्रसंगी बोलताना सुरेश प्रभू यांनी सांगितले की, "आम्ही रत्नागिरी येथून लवकर विमान सेवा सुरु करण्यासाठी पूर्ण वचनबद्ध आहोत. रत्नागिरी-मुंबई-रत्नागिरी मार्गावर हवाई वाहतुकीसाठी उडान 3.1 अंतर्गत निविदा मागवल्या गेल्या आहेत. नागरी टर्मिनल बांधण्याचे काम आणि नेव्हीगेशन सुविधांच्या स्थापनेची कार्यवाही करण्यासाठी भारतीय विमानतळ प्राधिकरण आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) यांच्यात सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली जाणार आहे. आम्ही कोकणच्या विकासासाठी बांधील आहोत आणि त्यासाठी लवकरात लवकर विमान सेवा सुरु करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. कोकण क्षेत्रातील पर्यटन व अर्थव्यवस्था वाढवण्यासाठी सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी हे दोन्ही विमानतळ कार्यान्वित करणार असून यामुळे नक्कीच कोकणाचा विकास होईल.”
महाराष्ट्रात विमान वाहतुकीला चालना देण्यासाठी 700 कोटी रुपयांपेक्षा जास्त निधीला मंजुरी देण्यात आली आहे. याशिवाय सिंधुदुर्ग येथील ग्रीनफिल्ड विमानतळ 520 कोटी रुपयांच्या प्रकल्प खर्चासह तयार आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्यासाठी 1200 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे प्रकल्प मंजूर केले गेले आहेत. यात कोल्हापूर, पुणे तसेच पुरंदर, नवी मुंबई आणि बोरामनी आदी विमानतळांचा समावेश आहे.
औरंगाबाद, जळगाव, कोल्हापूर, नां देड, नाशिक आणि सोलापूर आधीच उडान 1 आणि उडान 2 अंतर्गत जोडलेले आहेत. महाराष्ट्रात पुणे येथे प्रवाशांची सर्वाधिक वाढ झाली आहे, जी 2017-18 मध्ये 20 टक्के होती. महाराष्ट्रातील एकूण प्रवाशांची वाढ देखील उल्लेखनीय आहे. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीचा विमानतळ सुरु झाल्याने उत्तर कर्नाटक आणि महाराष्ट्रचे विमानतळ जोडले जाऊन सुंदर किनारपट्टी लाभलेल्या कोकण क्षेत्रातील प्राचीन मंदिर आणि ऐतिहासिक किल्ल्यांचे पर्यटन सुलभ होईल, तसेच कोकणासह, पश्चिम महाराष्ट्र आणि गोवा भागाचा विकास होण्यास मदत होईल.
येत्या काळात कार्गो हब आणि कोकणातील बंदरे या विमानतळाशी जोडण्याचा मानस असून चिपी विमानतळावरून हवाई वाहतूक (उडान योजना) लवकरच सुरू होईल.
तसेच वैभववाडी-कोल्हापूर नवीन रेल्वे लाईनलाही (107.76 किमी) रेल्वे बोर्डाकडून मंजुरी मिळाली असून प्रस्तावित 107.76 किमी नवीन रेल्वे लाइन प्रकल्प 3438.510 कोटी रुपयांचा आहे. महाराष्ट्र राज्य आणि रेल्वे बोर्ड या प्रकल्पामध्ये 50:50 च्या माध्यमातून वित्तपुरवठा करतील. कोकण भागाला देशाच्या प्रमुख शहरांशी जोडले जाईल. कोल्हापूर मार्गे महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटक आणि गोवा देखील या मार्गाद्वारे जोडले जाईल.
यावेळी मत्स्यबीज केंद्र उदघाटन, मासेमारी बंदराचे भूमिपूजन, पोलीस कर्मचाऱ्यांसाठी मालकीचे घर वाटप, सीसीटीवी प्रकल्पाचे लोकार्पण, देवगड पवनचक्कीचे लोकार्पण, चांदा ते बांदा योजने अंतर्गत मच्छीमार बांधवांना जाळी वाटप तसेच बंधाऱ्याचे भूमिपूजन, विक्रमी तांदूळ उत्पादक शेतकऱ्यांचा सत्कार, श्रमयोगी योजना लाभार्थी कार्ड वाटप, प्रधानमंत्री किसान योजना लाभार्थी प्रमाणपत्र वाटप आदी कार्यक्रम संपन्न झाले.