Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, फेब्रुवारी १७, २०१९

विवाह खर्चाचे ओझे कमी करा

विवाह खर्चाचे ओझे कमी करा

- सामूहिक विवाहासारख्या उपक्रमांची गरज -  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
- भावली धरणातून शहापूर परिसरास पाणी




ठाणे, दि: १७ - सामूहिक विवाह सोहळ्यांचे आयोजन ही खूप चांगली संकल्पना असून त्यामुळे कुटुंबांवर पडणारे मोठे खर्चाचे ओझे दूर करता येईल, आज विवाह होणाऱ्या आदिवासी जोडप्यांच्या परिवारात आम्हीही सहभागी होऊ शकलो, माझे खूप आशीर्वाद अशा भावपूर्ण शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ११०१ जोडप्यांना शुभेच्छा दिल्या . यावेळी त्यांनी भावली धरणातील पाण्याच्या प्रश्नासह शहापूर तालुक्याच्या सर्व समस्या प्राधान्याने दूर करण्यात येतील असेही सांगितले.

खासदार कपिल पाटील फाऊंडेशन व हिंदू सेवा संघ (महाराष्ट्र) यांच्या सहयोगातून आसनगाव येथे १ हजार एकशे एक आदिवासी जोडप्यांचा विवाह सोहळा आज पार पडला, त्याप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. मुख्यमंत्र्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून आदिवासी जोडप्यांना शुभाशिर्वाद दिल्यामुळे नवविवाहित जोडप्यांच्या चेहऱ्यावरील आनंद द्विगुणीत झालेला दिसत होता.

ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, पालघरचे पालकमंत्री विष्णू सवरा, खासदार कपील पाटील, दिंडोरीचे खासदार हरिशचंद्र चव्हाण, खासदार डॉ विनय सहस्त्रबुद्धे, आमदार किसन कथोरे, आमदार गणपत गायकवाड, नरेंद्र पवार, निरंजन डावखरे, हिंदू सेवा संघाचे काका जगे, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर आदींची यावेळी उपस्थिती होती.

शहापूर तालुक्याचे सर्व प्रश्न सोडविणार

भावली धरणातील पाणी शहापूर आणि परिसराला देण्यासंदर्भात सर्व कार्यवाही पूर्ण झाली आहे, याबाबतीत जल संपत्ती नियामक प्राधिकरणाच्या निर्णयानंतर तातडीने अंमलबजावणी केली जाईल असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, पेसा कायद्यातील काही तरतुदींमुळे विवाद होऊ नये यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत

सामूहिक विवाह सोहळ्यासारखे उपक्रम अधिकाधिक व्हावयास हवे. आदिवासी समाजाने जल- जमीन- जंगल खऱ्या अर्थाने टिकविले, आपल्या संस्कृतीचे रक्षण केले, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात ५ जोडप्यांना मंगळसूत्र, प्रधानमंत्री उज्वला योजनेत गॅस तसेच जिंदाल कंपनीतर्फे संसारोपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले.
पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी भावली धरणातून लवकरात लवकर शहापूर परिसरास पाणी मिळावे अशी मागणी केली. विदर्भ व मराठवाड्यात देखील सामूहिक विवाहाच्या माध्यमातून अनेक विवाह करण्यात आले. शिवसेनाप्रमुखांच्या नावाने कन्यादान योजनेत अनेक गरीब शेतकरी व कुटुंबांना आधार दिल्याचेही ते म्हणाले

शैक्षणिक आणि सामाजिक मागासलेपणामुळे घरी आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नसली तरीही लग्नासारख्या सोहळ्यावर कर्ज काढून खर्च करण्याची हौस अनेकांसाठी पुढील आयुष्यात अडचणीची ठरली आहे. आयुष्यातील उमेदीची वर्षे लग्नासाठी घेतलेले कर्ज फेडण्यात व्यतित केल्याने आर्थिक आघाडीवर अडचणींचा सामना करावा लागतो. परिणामी अपेक्षित प्रगती साधता येत नाही. ही बाब लक्षात घेऊन या अनोख्या आणि समाजोपयोगी उपक्रमाचे आयोजन केल्याचे खासदार कपील पाटील म्हणाले.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.