योजना प्रत्येक दिव्यांगांपर्यंत पोहोचाव्यात - महापौर नंदा जिचकार
नागपूर, ता. १७ : अनेक अडचणींवर मात करून आज दिव्यांग खेळाडू प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर आहेत. केंद्र व राज्य शासनाच्या वतीने आज दिव्यांगासाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांचा प्रत्येक दिव्यांगाला लाभ मिळणे आवश्यक आहे. शासनाच्या योजना दिव्यांगांसाठी मोठा आधार आहेत. या योजना प्रत्येक दिव्यांगांपर्यंत पोहोचाव्यात यासाठी नागपूर महानगरपालिका सदैव तत्पर आहे, असे प्रतिपादन महापौर नंदा जिचकार यांनी केले.
नागपूर महानगरपालिका व पॅरा व्हॉलिबॉल असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या सुभेदार सभागृहात आयोजित महापौर चषक सीनिअर पॅरा सिटींग व्हॉलिबॉल राज्य स्पर्धेचा रविवारी (ता. १७) समारोप झाला. यावेळी महापौर नंदा जिचकार बोलत होत्या. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून क्रीडा समिती सभापती नागेश सहारे, स्पर्धेचे संयोजक नगरसेवक दिनेश यादव, पॅरा व्हॉलिबॉल असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष नामदेवराव बलगर, उपाध्यक्ष राजू दुधनकर, धनंजय उपासनी, क्रीडा निरीक्षक नरेश चौधरी, जितेंद्र गायकवाड उपस्थित होते.
पुढे बोलताना महापौर म्हणाल्या, दिव्यांग असूनही मैदानात एक खेळाडू म्हणून वावरणा-या प्रत्येक खेळाडूचा उत्साह अनेक दिव्यांगांना प्रेरणा देणारा आहे. प्रत्येक दिव्यांगांनी एका खेळामध्ये तरी पुढे यावे. खेळामुळे व्यक्तीमधील आत्मविश्वास वाढतो व नवी ऊर्जा मिळते. प्रत्येकाने आपल्यातील खेळाडूवृत्ती सदैव जोपासावी, केंद्र, राज्य शासनासह नागपूर महानगरपालिकाही सदैव आपल्या सोबत आहे. दिव्यांग खेळाडूंना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी अशा स्पर्धांचे आयोजन महत्वाचे असून दरवर्षी दिव्यांगांसाठी अशा स्पर्धा व्हाव्यात यासाठी नागपूर महानगरपालिका प्रयत्नरत आहे, असेही महापौर नंदा जिचकार म्हणाल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पॅरा व्हॉलिबॉल असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष नामदेवराव बलगर यांनी तर संचालन असोसिएशनचे सचिव राहुल लेकुरवाळे यांनी केले.
विजेत्या संघाला २५ हजार रूपये पुरस्कारस्पर्धेतील अंतिम सामन्यात यवतमाळ संघाने कोल्हापूर संघाला दोन सेटमध्ये २५-२०ने पराभवाचा धक्का देत विजेतेपद पटकाविले. अंतिम सामन्यात विजेत्या यवतमाळ संघाकडून देवदास कदमने सर्वाधिक ९ गुण केले तर अनिल पवार (८), दिलीप कांबळे (५), कमलाकर कराळे (४), संतोष घोडके (२) व संतोष रंजने (१) यांनीही संघाच्या विजयात मौलिक योगदान दिले. प्रतिस्पर्धी संघाकडून मितेश हरडेने ७ व छगन गुरनुलेने ६ गुण केले. विजेत्या यवतमाळ संघाला महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते विजयी चषक व २५ हजार रुपये पुरस्कार प्रदान करण्यात आले. तर उपविजेत्या कोल्हापूर संघाला चषक व २० हजार रुपये पुरस्कार देण्यात आले. तिस-या स्थानाच्या स्पर्धेत पुणे संघाला २६-२४ अशा दोन सेटमध्ये पराभूत करणा-या अकोला संघाला तृतीय पुरस्कार प्रदान करण्यात आले. याशिवाय महिला संघाला प्रोत्साहन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
उपांत्य फेरीत यवतमाळ संघाने अकोला संघाला तर कोल्हापूर संघाने पुणे संघाला पराभवाचा धक्का देत अंतिम फेरीत प्रवेश केला होता. स्पर्धेमध्ये राज्यातील १६ जिल्ह्यातील संघांनी सहभाग घेतला आहे. स्पर्धेत नागपूर शहर, नागपूर ग्रामिण, अमरावती, अकोला, सातारा,वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर, वाशिम, पुणे, मुंबई, कोल्हापूर, नंदुरबार, औरंगाबाद, बुलडाणा, यवतमाळ या १६ जिल्हा संघांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेत सहभागी सर्व संघांना यावेळी प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह प्रदान करण्यात आले.