संमेलन अध्यक्ष, जेष्ठ पक्षी अभ्यासक दिलीप विरखडे यांचे आवाहन
- 19 वे विदर्भ पक्षीमित्र संमेलनाचे प्रधान मुख्य वनसंरक्षक काकोडकर यांच्या हस्ते उद्घाटन
चंद्रपूर/ प्रतिनिधी
पक्ष्यांचा अभ्यास आणि छायाचित्रणात्मक, नोंदी करण्याकरिता आपण उत्तम प्रतीचे कैमेरे घेतलेत. ते आपल साधन होत. पण साधनच आपलं साध्य बनलं आणि आपण फोटोग्राफीत अडकून पडलो. संकटग्रस्त पक्षी प्रजातींच्या यादीत दिवसेंदिवस भरच पडत आहे. क्षेमकुशल यादीतील कोणता पक्षी केव्हा संकटग्रस्त होईल याचा नेम नाही. त्यामुळे कॅमेरे बाजुला सारुन पक्षी संवर्धन चळवळीत उतरा, असे आवाहन संमेलन अध्यक्ष, जेष्ठ पक्षी अभ्यासक दिलीप विरखडे यांनी केले.
महाराष्ट्र पक्षीमित्रच्या १९ वे विदर्भ पक्षीमित्र संमेलनाचे उदघाटन शनिवार, दिनांक ९ रोजी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कर्मवीर कन्नमवार सभागृहात सकाळी पार पडले.
उद्घाटन राज्याचे प्रधान मुख्य संरक्षक (वन्यजीव) नितीन काकोडकर यांच्या हस्ते झाले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोपाल ठोसर, , प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र पक्षीमित्रचे अध्यक्ष डॉ. जयंत वडतकर, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पचे क्षेत्रसंचालक एन. आर. प्रवीण, स्वागताध्यक्ष डॉ. अशोक जीवतोड़े, मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष मनोहर पाऊनकर, ग्रीन प्लैनेटचे अध्यक्ष सुरेश चोपणे, मानद वन्यजीव रक्षक बंडू धोतरे आदी होते.
संमेलनाध्यक्ष श्री दिलिप विरखडे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात पक्षीमित्र चळवळीचे पक्षी संवर्धन बाबतीत योगदान विषद करून पक्षी अधिवासास असलेले धोके व त्यावर उपाय यावर आपले मत मांडले.
शतकोटी वृक्षलागवड योजनेद्वारे उजाड झालेल्या क्षेत्रात पुन्हा नव्याने जंगल निर्माण करण्याचा शासन प्रयत्न करीत आहे. यासाठी जिथे-जिथे मोकळी जागा आहे, तिथे तिथे वृक्ष लागवड करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी गावागावात जलयुक्त शिवाराच्या धर्तीवर वनयुक्त शिवार करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. या योजनेमुळे वनेतर क्षेत्रातील वृक्षांचं आच्छादन काही चौरस किमीने वाढल्याची नोंद आहे. त्यासाठी शासनाचं अभिनंदनच केलं पाहिजे. त्या त्या योजनांची चिकित्सा आपण केली पाहिजे, असे आवाहन करीत उघडबोडखं हिरवं झालं पाहिजे, हिरवं अधिक दाट झालं पाहिजे, दाट असलेलं घनदाट झालं पाहिजे, अशी आशा व्यक्त केली.
उदघाटक श्री. काकोडकर यांनी महाराष्ट्रातील पक्षी चळवळीचे महाराष्ट्र पक्षीमित्र संस्थेच्या वतीने गेल्या 38 वर्षापासून सातत्याने सुरू असलेल्या योगदानाबद्दल संस्थेची स्तुती करून पक्षांचे पर्यावरणातील महत्त्व विषद करून 'वेब आँफ लाईफ' या साखळीमधील कुठल्याही साखळीला धोका निर्माण होऊ, नये असे मत मांडले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष गोपाळ ठोसर यांनी मोजक्या लोकांपासून सुरू झालेली पक्षी चळवळ आज समाजात बऱ्यापैकी रूजली, अनेक पक्षी अभ्यासक निर्माण झाले या बाबत आनंद व्यक्त केला. पक्षी छायाचित्रकार काढीत असलेल्या फोटोंचे महत्त्व आहेच परंतु फोटो काढत असतांना आपन त्यांच्या संवर्धनासाठी काय करतो, हा सुद्धा विचार करावा असे आवाहन केले.
महाराष्ट्र पक्षीमित्रचे अध्यक्ष डॉ. जयंत वडतकर यांनी पक्षी संवर्धनासाठी पक्षी चळवळ ही अनेक वर्षापासून कार्यरत असुन अलीकडे पक्षी व त्यांचे अधिवास संवर्धन हे मोठे आव्हान चळवळी समोर असुन यासाठी ही चळवळ अधिक व्यापक होने गरजेचे आहे, समाजातील अनेकांनी यासाठी पुढे यावे, असे आवाहन केले.
यावेळी संमेलनाची 'माळढोक' स्मरणिका, ताडोबा प्रकल्प कडून त्रैमासिक पक्षी विशेषांक, अकोला जिल्ह्य ई-चेकलिस्ट चे प्रकाशन मान्यवर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शालेय निबंध व चित्रकला स्पर्धा चे पुरस्कार वितरण करण्यात आले. संमेलनाचे संचालन प्रशांत आर्वे यांनी तर आभार योगेश दुधपचारे यांनी केले. संमेलनाला महाराष्ट्रभरातील पक्षीमित्र सहभागी झाले आहेत.