- सारथी योजनेचा लाभ घ्यावा : ना. सुधीर मुनगंटीवार
- विवेक नगरच्या विकासाला पाच नगरसेवकांचे इंजीन; विकासासाठी निधीची कमतरता नाही
चंद्रपूर, दिनांक 17 फेब्रुवारी - खास चंद्रपूर महानगरातील महिलांसाठी त्यांच्या सन्मानासाठी व रात्रपाळीत काम करणाऱ्या महिलांना अभय देण्यासाठी सारथी योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ महिलांनी घ्यावा,असे आवाहन राज्याचे वित्त, नियोजन व वने मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांनी आज केले. विवेक नगर प्रभाग क्रमांक 5 मध्ये विविध विकास कामांची सुरुवात करताना त्यांनी महापौर अंजलीताई घोटेकर यांच्यासह पाच नगरसेवकाचे इंजिन या वार्डाला लागले असून विकासासाठी निधी कमी पडणार नाही,अशी घोषणाही यावेळी केली.
दुपारी 4 वाजता विवेक नगर प्रभाग क्रमांक 5 येथील नगर विकास निधी अंतर्गत विविध विकास कामांचे भूमिपूजन पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी केले. यावेळी व्यासपीठावर आमदार नानाभाऊ शामकुळे, महापौर अंजलीताई घोटेकर, उपमहापौर अनील फुलझेले,नगरसेवक संदीप आवारी, पुष्पाताई उराडे, रामपाल सिंग, राजू गोलीवार, मायाताई उईके प्रमोद शास्त्रकार, रवी आसवानी, नगरसेवक संजय कंचर्लावार, आशाताई आबुजवार, राजीव अडपेवार, माजी महापौर राखी कंचर्लावार, शितल कुळमेथे, जिल्हा परिषदेचे सभापती ब्रिज भूषण पाझारे, तुषार सोम आदींची उपस्थिती होती.
यावेळी 3 कोटी 15 लक्ष रुपये खर्चाच्या विविध योजनांचे भूमिपूजन संपन्न झाल्याची घोषणा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली. विवेक नगर प्रभागांमध्ये महापौर अंजलीताई घोटेकर, यांच्यासह नगरसेवक संदीप आवारी, पुष्पाताई उराडे, राजू गोलीवार, रवी आसवाणी असे एकूण पाच नगरसेवक आहेत. या वॉर्डातून मोठ्या प्रमाणात विकास कामे सुरू असून महापौर अंजलीताई घोटेकर यांच्या नेतृत्वात आणखीही निधी लागल्यास तो दिल्या जाईल अशी घोषणा त्यांनी केली.
याठिकाणी सर्वप्रथम पुलवामा येथील शहिदांना श्रद्धांजली व्यक्त करण्यात आली. पुलवामा येथील घटनेनंतर विकास कामांचा कार्यक्रम घ्यावा अथवा नाही, असा प्रश्न पडला होता. मात्र दोन दिवसांपूर्वी ज्या दिवशी ही घटना घडली. त्यावेळी यापूर्वीच्या सर्जिकल स्ट्राइकमध्ये प्रत्यक्ष सहभाग असणाऱ्या लेफ्टनंट जनरल निंभोरकर यांची भेट झाली. ते म्हणाले, विकास कार्य हे एक देशसेवेचे काम असून यामध्ये खंड पडता कामा नये. त्यामुळे हा कार्यक्रम आपण घेऊ शकलो, असे त्यांनी सांगितले.
देशभरातील घटनाक्रमांचा आढावा घेताना ते म्हणाले, या परिस्थितीमध्ये आपल्या तीव्र देश भावना व्यक्त करण्याच्या वेगवेगळ्या तऱ्हा असू शकतात. मात्र देशाच्या बळकटीसाठी वेगवेगळ्या माध्यमातून प्रयत्न करणे आपला क्षण अन क्षण त्यासाठी खर्ची करणे हीच खरी शहिदांना श्रद्धांजली ठरेल. भयमुक्त, भूकमुक्त, विषमतामुक्त, जातिमुक्त, समाज निर्माण करणे ही भारत मातेला खरी आदरांजली ठरेल. यावेळी त्यांनी वार्डामध्ये होणाऱ्या विकास कामाकडे जातीने लक्ष देण्याचे सर्वाना आव्हान केले .
शहराच्या सर्वांगीण विकासामध्ये निधीची कमतरता नाही. मात्र कामे व्यवस्थित झाली पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यावेळी त्यांनी पोलिस दलाने चंद्रपूर मध्ये सुरू केलेल्या सारथी उपक्रमाचे कौतुक केले. सारथी उपक्रमामार्फत महिलांना पूर्ण संरक्षण देण्यासाठी चंद्रपूर महानगरातील महिलांनी गरजेनुसार या योजनेचा उपयोग करावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी उपस्थित महिलांना केले. महाराष्ट्रात फक्त चंद्रपूर महानगरात अशा पद्धतीची व्यवस्था केली असून यासाठी पोलीस दलाला निधी व सुविधा उपलब्ध करून आहेत. यावेळी बोलताना त्यांनी माता महांकालीच्या जिल्ह्यात यापुढे छेडखानी सारख्या घटना होऊ नये यासाठी पोलिसांना कडक कारवाई करण्याबाबत निर्देश दिले आहेत. सोबतच चंद्रपूर आणि बल्लारपूर मध्ये लवकरच सीसीटीव्ही लावण्याचे काम सुरू होईल, असेही त्यांनी सांगितले.
केवळ नाशिक आणि चंद्रपूर जिल्ह्यासाठी प्राथमिक स्तरावर सुरू करण्यात आलेल्या प्रधानमंत्री जन आरोग्य योजने बद्दलची माहिती त्यांनी दिली. या योजनेचा लाभ घेऊन नागरिकांनी आवश्यक असे गोल्डन कार्ड तयार करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले. चंद्रपूर शहरांमध्ये अमृत योजनेची अंमलबजावणी होत असून पुढील पंचवीस वर्षाच्या पाणीपुरवठा योजनेचा विचार करून ही योजना सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे या योजनेची योग्य अंमलबजावणी व्हावी.
चंद्रपूर महानगरांमध्ये मोठ्या प्रमाणात महिला ह्या देखील वेगवेगळ्या ठिकाणी काम करतात. त्यामुळे त्यांच्यासाठी सार्वजनिक स्वच्छतागृह बांधण्याची सूचना यावेळी त्यांनी महापौर अंजलीताई घोटेकर यांना केली. यासाठी गरज पडल्यास आपण निधी उपलब्ध करून देऊ, परंतु प्रत्येक वार्डामध्ये स्वच्छतागृह निर्माण झाले पाहिजेत, असेही त्यांनी स्पष्ट केले .
या राज्याच्या, शहराच्या विकासासाठी दुसरा कोणीतरी येऊन काम करेल,अशी अपेक्षा बाळगणे ऐवजी स्वतः आपले दायित्व पूर्ण करावे व आपणही त्यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहनही उपस्थितांना केले. या कार्यक्रमाचे संचालन श्याम हेडाऊ यांनी केले.
या कार्यक्रमातच अद्यावत अशा रुग्णवाहिकेचे लोकार्पण नामदार मुनगंटीवार यांनी केले. महापौर अंजलीताई घोटेकर व उपमहापौर अनिल फुलझेले यांना 19 लक्ष रुपये किमतीच्या या ॲम्बुलन्सची चाबी त्यांनी सुपूर्द केली.