रामटेक /तालुका प्रतिनिधी:
रामटेकच्या गडावर भोसला देवस्थान हे विदर्भातील अतिप्राचीन देवस्थान असून या ठिकाणी प्रभू श्रीरामचंद्राचे व अन्य मंदिरे आहेत.अतिशय पुरातन असलेल्या या मंदिराच्या मालकी संबंधी माननीय उच्च न्यायालय नागपूर येथे प्रकरण सुरू आहे. त्यानुषंगाने या मंदिराचा कारभार बघण्यासाठी न्यायालयाने रिसिवर म्हणून रामटेकचे उपविभागीय अधिकारी (राजस्व)यांची नियुक्ती केलेली आहे.राम मंदिरात करोडो करोडो रुपयांची संपत्ती आहे.गड मंदिराची शेकडो एकर शेती आहे.शेती व मंदिरात असलेल्या दानपेट्या व देणगी याद्वारे देवस्थानला दरवर्षी लाखो रुपये उत्पन्न मीळते. गेल्या 2010 पासून या मंदिराच्या व्यवहारांचे ऑडिट झाले नसल्याचे धक्कादायक वृत्त आहे.
याबाबत रामटेकच्या रामभक्तांनी नागपूरचे जिल्हाधिकारी यांना दिनांक 2 जुलै 2018 रोजी विशेष अर्ज लिहून ऑडिट करण्याची मागणी केली आहे.जिल्हाधिकारी यांनी याबाबत कारवाई करण्यासाठी हा अर्ज सहायक धर्मादाय आयुक्त नागपूर यांचेकडे दिनांक 19 जुलै रोजी पाठविलेला आहे. धर्मदाय आयुक्त कार्यालयातून याबाबत कुठलेही प्रकारचे कार्यवाही अद्याप झालेली नाही. विशेष बाब अशी की या देवस्थानचा आर्थिक कारभार सांभाळणारे निरीक्षण अधिकारी चंद्रशेखर बावनकर यांनी देवस्थानात बर्याच आर्थिक भानगडी केल्याचे बोलले जाते.रामटेकचे तत्कालीन ऊपविभागिय पोलीस अधिकारी डा.दिपक साळुंके या देवस्थानचे रिसीवर होते.त्यांच्या या चार वर्षांचे कार्यकाळातील रोकड पुस्तक लिहिलेले नाही अशीही माहिती आहे.या सर्व बाबींची चौकशी तत्कालीन रिसिवर राम जोशी यांनी केली. वर्षभराच्या चौकशीनंतर त्यांच्या बडतर्फीचे आदेशही त्यांनी काढले मात्र अद्यापही बावनकर कामावरच असल्याचे दिसून येते. राम मंदिराच्या आर्थिक व्यवहाराचे ऑडिट लवकरात लवकर करण्यात यावे अशी मागणी रामटेकातील राम भक्तांनी केली आहे.
निरीक्षक अधिकारी बावनकर यांना बडतर्फ केल्यानंतर त्या रिक्त जागेवर नियुक्तीसाठी रामटेक चे तत्कालीन उपविभागीय अधिकारी व रिसीवर राम जोशी यांनी तशी जाहिरात काढून अनेकांचे अर्ज मागवले प्रत्यक्ष मुलाखती घेऊन यापैकी अतुल पोटभरे यांची या पदावर नियुक्ती केल्याचे समजते. मात्र त्या पदाचे नियुक्तीपत्र अद्याप देण्यात आलेले नाही.एकूणच रामटेक गड मंदिराचा कारभार भोंगळ पणे सुरु असून याकडे माननीय उच्च न्यायालयाने गंभीरपणे लक्ष देण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. दरम्यान राम जोशी यांची बदली झाली आहे व रामटेक येथे नव्याने रुजू झालेले उपविभागीय अधिकारी जोगेंद्र कट्यारे हे आता रामटेकच्या गड मंदिराचे रिसीवर आहेत.या पार्श्वभूमीवर ते काय भूमिका घेतात याकडे रामटेक वासियांचे लक्ष लागले आहे.