Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, सप्टेंबर ०७, २०१८

बॉक्सिंगसाठी नागपूर येथे ॲकॅडमी सुरु करणार

                                           
राज्यातील 32 खेळाडूंना शासकीय सेवेत नियुक्ती
एशियाड व ऑलिम्पिक स्पर्धेच्या तयारीला सुरुवात
मुलींनी मेरीकोमचा आदर्श समोर ठेवावा

नागपूर/प्रतिनिधी:
बॉक्सिंग या खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी येथील विभागीय क्रीडा संकुल परिसरात बॉक्सिंग ॲकॅडमी सुरु करण्यात येवून खेळाडूंना बॉक्सिंगसोबतच इतर खेळांसाठी आवश्यक सुविधा निर्माण करण्यात येतील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.


राज्यातील खेळाडू व खेळांच्या विविध प्रकाराला प्रोत्साहन मिळावे यासाठी शासनाच्या वर्ग-1 व वर्ग- 2 या पदावर 32 खेळाडूंना शासकीय सेवेत नियुक्ती देण्यात आली आहे. त्यामुळे खेळाकडे एक करिअर म्हणून पाहण्यास सुरुवात करा. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदके मिळवून राज्याचा व देशाचा लौकिक वाढवा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केले.
सिव्हिल लाईन्स येथील राणीकोठी येथे नागपूर महानगरपालिका व नागपूर महानगर बॉक्सिंग असोसिएशन, बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या वतीने सब ज्युनियर गर्ल्स नॅशनल बॉक्सिंग चॅम्पीयनशिपचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेतील विजयी खेळाडूंना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पदक देवून गौरव करण्यात आला. त्यावेळी मार्गदर्शन करताना फडणवीस बोलत होते. 
यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर श्रीमती नंदाताई जिचकार, आमदार सुधाकर कोहळे, लघु उद्योग विकास महामंडळाचे अध्यक्ष संदीप जोशी, उपमहापौर दीपराज पार्डीकर, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, महानगरपालिका आयुक्त रविंद्र ठाकरे, दयाशंकर तिवारी, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड तसेच बॉक्सिंग असोसिएशन व फेडरेशनचे पदाधिकारी उपस्थित होते.
राष्ट्रीय सब ज्युनियर बॉक्सिंग चॅम्पीयनशिप स्पर्धेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते क्रीडा ज्योत प्रज्वलीत केल्यानंतर स्पर्धेतील अंतिम लढतीच्या कुमारी संजना (दिल्ली) व कुमारी देविका (महाराष्ट्र) यांच्या लढतीला सुरुवात करण्यात आली. महाराष्ट्राची कुमारी देविका ही विजेती ठरली. 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, देशातील खेळाडू विविध क्रीडा प्रकारांमध्ये घवघवीत यश मिळवित आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेतील देदिप्यमान यश आपण सर्वजण पाहात आहोतच. खेळ हे मोठे करिअर असून याला प्रोत्साहन देण्यावर भर देण्यात येत आहे. राज्यातही विविध क्रीडा प्रकारांमध्ये खेळाडूंना तंत्रशुद्ध प्रशिक्षण देण्यात येत आहे. विविध आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय क्रीडास्पर्धांमध्ये अव्वल यश संपादन केलेल्या खेळाडूंना थेट भरतीद्वारे शासन सेवेत समाविष्ट करुन घेण्यात येत आहे. राष्ट्रीय स्तरावरील बॉक्सिंग स्पर्धेचे आयोजन नागपूर येथे करण्यात आले. ही बाब नागपूरसाठी गौरवास्पद आहे. बॉक्सिंग क्षेत्रातील मेरीकोम हे अनेकांचे आदर्श स्थान असून अशाप्रकारच्या स्पर्धांमधून भावी मेरीकोम तयार होतील असा विश्वासही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. 

महाराष्ट्रातून एशियाड व ऑलिम्पिकच्या सन 2020 व 2024 या स्पर्धांसाठी देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंची निवड प्रक्रिया सुरु करण्यात आली असून यासाठी खेळाडूंना आवश्यक सुविधा देण्यात येणार असल्याचे सांगताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आशियाई क्रीडा स्पर्धेत खेळाडूंनी सर्वोत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्याचप्रमाणे आगामी स्पर्धांमध्येही राज्यातून सर्वाधिक पदकविजेते खेळाडू राहतील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. 

महापौर नंदाताई जिचकार म्हणाल्या, नागपूर येथे राष्ट्रीय सब ज्युनियर बॉक्सिंग चॅम्पीयनशिप स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. ही बाब नागपूरकरांसाठी नक्कीच गौरवास्पद आहे. महापालिकेतर्फेही विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येत असून विविध क्रीडा प्रकारात मुली यश संपादन करीत असल्याचे जिचकार यांनी सांगितले.
बॉक्सिंग स्पर्धेमध्ये 31 राज्यातील 399 खेळाडू सहभागी झाले असून केरळमध्ये पुराचे मोठे संकट आल्यानंतरही तेथील 14 खेळाडू या स्पर्धेमध्ये सहभागी झाले आहेत. बॉक्सिंग खेळामध्ये अकोला हे मुख्य केंद्र असून नागपूर येथेही या खेळाला प्रोत्साहन मिळत असल्यामुळे बॉक्सिंगसाठी राष्ट्रीय अकादमी सुरु करावी अशी विनंती आयोजन समितीचे प्रमुख दयाशंकर तिवारी यांनी केली. या स्पर्धेसाठी प्रथमच रोख पारितोषिक देण्यात येत असून यासाठी महापौर श्रीमती नंदाताई जिचकार 1 लाख 40 हजार रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.