विनोद बोंदरे, कार्यकारी संचालक बेस्ट एच.आर.प्रोफेशनल पुरस्काराने सन्मानित
यशाचे श्रेय महानिर्मिती व्यवस्थापन व टीम मानव संसाधनचे
नागपूर/प्रतिनिधी:
टाईम्स असेंट द्वारा आयोजित आशिया पॅसेफिक एच.आर.एम. कॉंग्रेस २०१८ शिखर परिषदेत महानिर्मितीला दोन आशियास्तरीय पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले. कॉर्पोरेट(पी.एस.यु.) संस्थात्मक पातळीवर बेस्ट एच.आर. प्रॅकटीसेसकरिता महानिर्मितीला तर वैयक्तिक पातळीवर बेस्ट एच.आर. प्रोफेशनल पुरस्काराने महानिर्मितीचे कार्यकारी संचालक विनोद बोंदरे यांना गौरविण्यात आले.
पुरस्काराचे मुल्यांकन विशेषत: प्रकल्पग्रस्त विषयक धोरणांची अंमलबजावणी, प्रकल्पबाधित गावांतील तरुण-तरुणींसाठी शिष्यवृत्ती योजना, ऑनलाईन व पारदर्शकतेने भरती प्रक्रियेचा दृष्टीकोन, भरती ते सेवानिवृत्ती एक खिडकी योजना, क्रीडा/नाट्य स्पर्धा, सांघिक सामाजिक जबाबदारी अंतर्गत प्रत्यक्ष उपक्रम इत्यादींवर आधारित आहे. मागील काही वर्षांत वरिष्ठ व्यवस्थापनाच्या सहकार्याने महानिर्मितीमध्ये नवनवीन बदल स्वीकारल्याने उत्साहाचे वातावरण आहे व हे दोन पुरस्कार त्याचीच पावती असल्याचे विनोद बोंदरे यांनी सांगितले.
ऊर्जा,कोळसा, पेट्रोलियम, ऑईल,खनिकर्म, टेलीकॉम, बँकिंग, आय.टी., वस्त्रोद्योग, फूड, आरोग्य, रियल इस्टेट मधील नामांकित कोर्पोरेट जगताचा या परिषदेमध्ये सहभाग होता. शिखर परिषदेचे संयोजक डॉ. आर. एल. भाटीया,आय.आय.एम. अहमदाबादच्या माजी डीन डॉ. इंदिरा पारीख, डॉ.न्यूटन व डॉ.लक्ष्मी यांचे हस्ते सदर पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. पुरस्कार वितरण समारंभाप्रसंगी महानिर्मितीचे महाव्यवस्थापक(मासं) आनंद कोंत, वरिष्ठ व्यवस्थापक(मासं) रणधीर पाठक प्रामुख्याने उपस्थित होते.
कॉर्पोरेट जगतात मानव संसाधन विषयक नाविन्यपूर्ण कार्य करणाऱ्या व्यावसायिकांची, त्यांच्या नेतृत्वगुणांची, बुद्धिमत्तेची चुणूक जगासमोर आणून इतरांना प्रेरणा मिळावी या उद्देशाने “प्रत्यक्षात, दृष्टीकोन आणि गरज” या संकल्पनेवर दोन दिवसीय शिखर परिषदेचे आयोजन हॉटेल ताज व्हिवांटा यशवंतपूर बेंगलुरू(कर्नाटक) येथे ४ व ५ सप्टेंबर २०१८ रोजी आयोजित करण्यात आले होते.
आशिया खंडातील भारत, बांग्लादेश,श्रीलंका, इंडोनेशिया, मलेशिया आणि मालदीव अशा कॉर्पोरेट क्षेत्रातील ४५० मानव संसाधन विषयक प्रतिनिधी ह्यामध्ये सहभागी झाले होते. सुमारे ५० तज्ज्ञ/सुप्रसिद्ध वक्ते, मानव संसाधन विषयक अभिनव २० प्रभावी सत्रे अशी या शिखर परिषदेची भव्यता होती. संस्थात्मक व वैयक्तिक पातळीवर उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ५० कॉर्पोरेटसची परीक्षकांनी निवड करून मान्यवरांच्या हस्ते सदर पुरस्कारांचे ह्या शिखर परिषदेत वितरण करण्यात आले.
महानिर्मितीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक बिपीन श्रीमाळी, संचालक(संचलन) चंद्रकांत थोटवे, संचालक(प्रकल्प) विकास जयदेव, संचालक(वित्त) संतोष आंबेरकर, संचालक तथा सल्लागार(खनिकर्म) श्याम वर्धने तसेच सर्व कार्यकारी संचालक व वीज केंद्रांचे मुख्य अभियंते यांनी विनोद बोंदरे व टीम महानिर्मिती मानव संसाधनचे ह्या निमित्ताने विशेष अभिनंदन केले आहे.