Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, जुलै १५, २०१८

१६ जुलैला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महानिर्मितीच्या तीन महत्वाकांक्षी प्रकल्पांचे भूमिपूजन

संबंधित इमेजनागपूर/प्रतिनिधी:
महानिर्मितीच्या महत्वाकांक्षी अश्या तीन प्रकल्पांचा भूमिपूजन समारंभ सोमवार १६ जुलै २०१८ रोजी सकाळी १० वाजता कविवर्य सुरेश भट सभागृह, रेशीमबाग नागपूर येथे माननीय नामदार श्री. देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री यांचे शुभहस्ते संपन्न होणार आहे.
याप्रसंगी मा.ना.श्री. नितीन गडकरी केंद्रीय मंत्री, मा.ना.श्री. पीयूष गोयल केंद्रीय मंत्री, मा.ना.श्री. हरदीप सिंह पुरी केंद्रीय राज्यमंत्री, मा.ना.श्री.चंद्रशेखर बावनकुळे ऊर्जामंत्री, मा.ना.श्री. मदन येरावार राज्यमंत्री (ऊर्जा), यांच्या प्रमुख उपस्थितीत, मा.महापौर नागपूर, मा.खासदार राज्यसभा-लोकसभा, यांच्या विशेष उपस्थितीत तसेच नागपूर जिल्ह्यातील सर्व सन्माननीय आमदारांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.वेकोलिच्या पाच कोळसा खाणींतून पाईप कन्व्हेयरद्वारे औष्णिक वीज केंद्र कोराडी व खापरखेडा येथे कोळसा पुरवठा करणे, वेकोलिच्या भानेगाव कोळसा खाणीतील पाण्याचा खापरखेडा वीज केंद्रात वापर करणे, भांडेवाडी येथे सांडपाण्यावर प्रक्रिया करून औष्णिक वीज केंद्र खापरखेडा व कोराडी येथे पुनर्वापर करणे या तीन महत्वाकांक्षी प्रकल्पांचा यात समावेश आहे. 
महानिर्मिती, वेकोली व महानगर पालिकेच्या परस्पर सहकार्यातून हे प्रकल्प साकारणार आहेत.माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी या दोन्ही नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली व उर्जामंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वातील हे तीनही प्रकल्प निश्चितच देशाला प्रेरणादायी ठरणारे आहेत. 
पाईप कन्व्हेयरद्वारे कोळसा पुरवठा प्रकल्प : 
महानिर्मितीच्या औष्णिक वीज केंद्रांना होणारा कोळसा पुरवठा हा प्रामुख्याने वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडद्वारे रेल्वे वॅगन्समार्फत केला जातो. महानिर्मितीच्या खापरखेडा, कोराडी, चंद्रपूर वीज केंद्रांना लगतच्या खाणींतून रोप वे द्वारे आणि रस्ते वाहतूकिच्या माध्यमातून कोळसा पुरवठा करण्यात येतो. पर्यावरणीय दृष्टीकोनातून याबाबत पर्यायी व्यवस्था म्हणून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून आता पाईप कन्व्हेयर प्रणालीद्वारे कोळसा वाहतूक केली जाणार आहे. रस्ते वाहतुकीच्या तुलनेत हि प्रणाली अधिक किफायतशीर व सुरक्षित आहे. वेस्टर्न कोल फिल्ड्स लिमिटेडच्या इंदर, कामठी, गोंडेगाव, भानेगाव व सिंगोरी या पाच खुल्या खदानीतून पाईप कन्व्हेयरद्वारे, महानिर्मितीच्या कोराडी व खापरखेडा औष्णिक वीज केंद्रांना कोळसा पुरवठा करण्यात येणार आहे. नागपूर जिल्ह्यातील पाच खुल्या कोळसा खाणीतून, औष्णिक विद्युत केंद्रांना एकत्रितरित्या कोळसा वाहतूक करण्याची हि अभिनव व देशातील पहिली पथदर्शी योजना आहे. या प्रकल्प उभारणीची अंदाजे किमत ४४३.९१ कोटी आहे. या प्रकल्पामुळे, रस्ते वाहतुकीत हवेत मिसळणाऱ्या कोळसा भुकटीचे प्रदूषण रोखले जाऊन, रस्ते वाहतूक अधिक सुरक्षित होईल. कोळशाचा दर्जा अबाधित राहून कोळसा हानीवर नियंत्रण ठेवता येईल व पावसाळ्यात उद्भवणाऱ्या ओल्या कोळशाच्या समस्येचे देखील निराकरण होईल. 
भांडेवाडी सांडपाणी पुनर्वापर प्रकल्प :
वीज निर्मिती प्रक्रियेत फार मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवश्यकता असते. कृषी क्षेत्र, औद्योगिक क्षेत्र आणि नागरिकांना पिण्याचे पाणीपुरेसे उपलब्ध करून देण्यासाठी दीर्घकालीन नियोजन करणे हि काळाची गरज आहे. भांडेवाडी नागपूर येथील महानिर्मितीचा पहिला वहिला व पथदर्शी असा प्रतिदिन १३० दशलक्ष घनलिटर क्षमतेचा देशातील सर्वात मोठा सांडपाणी पुनर्वापर प्रकल्प यशस्वीपणे कार्यान्वित केल्यानंतर आता दुसऱ्या प्रतिदिन २०० दशलक्ष घनलिटर क्षमतेच्या प्रकल्पाचे भूमिपूजन होत आहे. यापैकी प्रतिदिन ५० दशलक्ष घनलिटर पाणी कोराडी औष्णिक विद्युत केंद्राला तर प्रतिदिन १०० दशलक्ष घनलिटर पाणी खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्राला पुरविण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे नागपूर महानगर पालिकेला अतिरिक्त ३० कोटी रुपये मिळणार आहेत. महानिर्मिती, नागपूर महानगर पालिका आणि नागपूर वेस्ट वॉटर मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड यांच्यातील त्रिपक्षीय करारानुसार हा प्रकल्प उभारला जाणार असून अत्याधुनिक एस.टी.पी. व डिस्क फिल्टर्सच्या सहाय्याने सांडपाण्यावर त्रिस्तरीय प्रक्रिया करण्यात येणार आहे. या अभिनव प्रकल्पामुळे गोसेखुर्द धरण व नागनदीचे प्रदूषण रोखले जाणार असून, पेंच प्रकल्पातील नैसर्गिक पाण्याची मोठी बचत होणार आहे. हे अतिरिक्त पाणी शेती व पिण्याकरिता वापरण्यास उपलब्ध झाल्यामुळे या योजनेचा तिहेरी लाभ होणार आहे.
भानेगाव खाण पाणी वापर:
कोळसा खाणीतील वापरात नसलेल्या पाण्याचा पुनर्वापर व्हावा यासाठी महानिर्मिती व वेस्टर्न कोल फिल्ड्स लिमिटेड यांच्या हा संयुक्त प्रकल्प आहे. ह्या प्रकल्पातून भानेगाव खदानीतून वार्षिक सुमारे १०.७६ दशलक्ष घनलीटर इतके पाणी खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्रास उपलब्ध होणार आहे. पेंच प्रकल्पातून खापरखेडा वीज केंद्राला पुरवल्या जाणाऱ्या नैसर्गिक पाण्याच्या प्रमाणात अतिरिक्त बचत होणार आहे. वेकोलीतर्फेहे पाणी महानिर्मितीला नि:शुल्क देण्यात येणार असून, प्रकल्पाची किमत सुमारे ९ कोटी इतकी आहे. एकूणच, जलव्यवस्थापनाच्या माध्यमातून निसर्ग संवर्धन, प्रदूषण नियंत्रण याबाबत महानिर्मिती व वेकोलीने उचललेल्या या विधायक व देशातील पथदर्शी प्रकल्पांची ठळक नोंद इतिहासात होणार आहे हे निश्चित.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.