Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, एप्रिल ११, २०१८

इराई धरणाचे संवर्धन होणार

Enrichment of Irai Dam for Generation of Energy | ऊर्जा निर्मितीसाठी इराई धरणाचे करणार संवर्धननागपूर/विशेष प्रतिनिधी:
चंद्रपूर जिल्ह्यातील महाजेनको अंतर्गत येणाऱ्या वीज निर्मिती प्रकल्पास इराई धरणाचे पाणी वापरले जाते, या धरणात पाणी मुबलक असावे, यासाठी या धरणाचे संवर्धन केले जाईल, अशी माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी दिली.
नवी दिल्ली नार्थ ब्लॉक येथे केंद्र्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या कक्षात बुधवारी चंद्रपूर  जिल्ह्यातील ऊर्जा विभागाशी निगडित विविध समस्यांवर बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीस महाजनेकोचे व्यवस्थापकीय संचालक बिपीन श्रीमाळी, महापारेषणचे व्यवस्थापकीय संचालक राजीव मित्तल , संचालक (खाण) श्याम वर्धने, उपस्थित होते.
चंद्रपूर जिल्ह्यात महाराष्ट्र राज्य वीजनिर्मिती कंपनी (महाजेनको) चा वीजनिर्मिती प्रकल्प आहे. याला लागणारे पाणी इराई धराणातून आणले जाते. सध्या धरणातील पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे वीजनिर्मिती करण्यास पुढील काळात समस्या निर्माण होऊ शकते. ती निर्माण होऊ नये, यासाठी चारगाव धरणाचे पाणी इराई धरणाला सोडले जाईल असा निर्णय बैठकीत घेण्यात आला. याशिवाय पाण्याची पातळी वाढविण्यासंदर्भातील इतर उपाययोजनाही आखण्यात येतील, असे बावनकुळे यांनी यावेळी सांगितले. इराई धरणाचे संवर्धन करण्यासाठी चंद्रपूर महानगरपालिका आणि महाजनकोमध्ये करार करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
चंद्रपूर जिल्ह्यातील जी गावे खाणीसाठी अथवा ऊर्जा प्रकल्पांसाठी अधिग्रहीत केलेली आहेत. अशा ५२ गावांमध्ये आतापर्यंत कोणताच लाभ सामाजिक दायित्व (सीएसआर) च्या माध्यमातून मिळालेला नाही. या गांवाना सीएसआरच्या निधीतून पायाभूत सुविधांचा विकास करणे आणि प्रकल्पग्रस्तांची बैठक घेऊन त्यांचे प्रश्न तातडीने सोडवून, त्यांच्या शैक्षणीक पात्रतेप्रमाणे ऊर्जा विभागातील विविध ठिकाणी असणाऱ्या  रिक्त जागांवर सामावून घेण्यासंदर्भात निर्णय यावेळी झाला.
याशिवाय वीज निर्मिती प्रकल्पाच्या ठिकाणी होणारी चोरी थांबविण्यसाठी अत्याधुनिक निगराणी तंत्रज्ञान बसविण्याबाबत मंजुरी देण्यात आली. सोबतच येथील वीज निर्मिती प्रकल्पामध्येच कोळसा वॉशरी प्रकल्प उभारण्यात येईल. यामुळे वाहतुकीवरील खर्चामध्ये बचत होईल.

बरांज कोळसा खाणीशी करार  

चंद्रपूर जिल्ह्यात असणाऱ्या वीज निर्मिती प्रकल्पाला रेल्वेमार्गाने कोळसा पुरविण्याकरिता अधिक खर्च येतो. हा खर्च कमी करण्यासाठी जवळच असलेल्या बरांज कोळसा खाणीतुन कोळसा मिळाल्यास सुविधा होऊ शकते. यासाठी बरांज कोळसा खाणीशी पुढील काळात करार करण्यात येईल, असा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

सौरऊर्जा महामंडळाच्या मदतीने ऊर्जा प्रकल्प उभारणार

महाजनकोचा चंद्रपूर जिल्ह्यातील रिकाम्या जागेचा अभ्यास करून या ठिकाणी भारत सरकारच्या सौरऊर्जा महामंडळ आणि महाजनकोमध्ये करार करून सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याबाबतचे बैठकीत निश्चित करण्यात आले.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.