ऊन्हाच्या वाढत्या तडाख्याने मानवासह वन्यजीवही मेटाकुटीला आले आहेत. राज्यभरात अनेक शहरात पारा चाळीशीपार पोहोचल्याने घामाच्या धारा निघत आहेत. चंद्रपूर जिल्हयातही उन्हाळ्याचे चटके बसायला लागले असून पारा ४३ अंशावर पोहचला आहे. कडक उन्हामुळे जंगलातील पाणवठे सुकल्यामुळे वन्य प्राण्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे वन विभागाने कृत्रीम पानवठे तयार केले असून या पाणवठयावर वन्य प्राण्यांनी गर्दी केली आहे.
ऊन्हाळ्यात पाणवठ्यावर आलेल्या प्राण्यांच्या लकबी टिपण्यासाठी हौशी छायाचित्रकार व पर्यटकांनी ताडोबामध्ये गर्दी झाली आहे. कोळसी येथील एका पाणवठ्यावर पट्टेदार वाघीन आपल्या दोन छाव्यांसह पाणी पिण्याकरीता आल्याचे छायाचित्र हौशी पर्यटक आणि छायाचित्रकार श्वेतकमार रंगा राव (Mr. Swethakumar Ranga Rao) यांनी टिपले आहे.
यावर्षी एप्रिल महिन्यापासूनच चंद्रपूरमध्ये तीव्र पाणी टंचाई जाणवत असलयामुळे वन्य प्राण्यांसाठी वनविभागाला पाणवठयाची संख्या वाढवावी लागण्याची शक्यता आहे. अन्यथा वन्य प्राण्यांचा मोर्चा पाण्याच्या शोधासाठी गावाकडे वळेल आणि मानव विरुद्ध प्राणी असा संघर्ष वाढण्याची शक्यता आहे. हा संघर्ष टाळण्यासाठी प्रशासनाला विशेष खबरदारी घ्यावी लागणार आहे.